कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागल दरम्यानच्या तासवडे व किणी येथील नाक्यावरून जाणाºया वाहनांच्या टोल दरात दहा टक्के दरवाढ करण्यात आली आहे. गुरुवारी दरवाढीच्या पहिल्याच दिवशी या वाढीव टोलवरून वादावादीच्या घटना घडल्याचे दिसून आले. इंधन दरवाढीने मेटाकुटीस आलेल्या वाहनधारकांना आता टोल दरवाढीचा झटका बसला आहे.
केंद्र सरकारने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बांधा, वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वावर तयार केला. यातील सातारा ते कागलपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे. सन २००५ पासून या रस्त्यावरील तासवडे, किणी टोलवरील पथकर वसुली महामंडळाकडून केली जाते. गत काही दिवसांपासून इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या दरामुळे वाहनधारक अगोदरच संतापले असताना टोलच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनधारक पुरते हतबल झाले आहेत.
कऱ्हाड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यासह हातकणंगले तालुक्यातील किणी टोलनाक्यावर गुरुवारपासून नवीन दरपत्रकानुसार वसुली सुरू करण्यात आली असून, वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी वाढीव दरावरून वाहनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.
- चौकट
टोलचे वाढलेले दर
वाहन : जुना दर : नवीन दर
कार, जीप : ७५ रु. : ८० रु.
हलके वाहन : १३५ रु. : १४५ रु.
ट्रक, बस : २६५ रु. : २९० रु.
- चौकट
५ ते ४५ रुपयांचा फटका
कमीत कमी ५ आणि अधिकाधिक ४५ रुपयांपर्यंत टोलदरात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ट्रक आणि बसच्या दरात जास्त वाढ झाली आहे.
- चौकट
‘फास्टॅग’वाले सुसाट
‘फास्टॅग’मुळे टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबावे लागत नाही. ‘फास्टॅग’च्या लेनमधून वाहने सुसाट निघून जातात. त्यानंतर त्यांच्या खात्यातून वळीत झालेल्या रकमेचा मेसेज वाहनधारकाच्या मोबाईलवर येतो. गुरुवारी वाढीव दराने रक्कम कपात करण्यात आली. आणि वाढीव पैसे गेल्याचे पाहून ‘फास्टॅग’धारकांनीही संताप व्यक्त केला.
- चौकट
पंधरा वर्षांत तेरा वेळा दरवाढ...
राष्ट्रीय प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने २००५ साली शेंद्रे ते कागल या १३३ किलोमीटरच्या अंतरातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर या अंतरात तासवडे व किणी हे दोन टोलनाके उभारले. त्यानुसार येथे टोलवसुली सुरू असून आत्तापर्यंत तेरा वेळा टोलदर बदलले आहेत. बहुतांशी वेळा टोलच्या दरात वाढच झाली आहे.
फोटो : ०१केआरडी०२
कॅप्शन : तासवडे, ता. कऱ्हाड येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला टोलनाका