लोणंद : ‘लोणंद नगरपंचायतीला राज्य शासनाच्या जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेली ७० लाखांची कामे ही आमदार मकरंद पाटील यांच्याच पाठपुराव्याने मंजूर झाली आहेत. या निधीचा आणि आमदारांचा काडीचाही संबंध नसल्याचा काँगे्रसच्या विरोधी पक्षनेत्यांचा आरोप म्हणजे निव्वळ बालीशपणा आहे. आमदारांवर बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे. त्यांच्या या आरोपांना व पोपटपंचीला लोणंदची जनता भुलणार नाही,’ असा प्रतिटोला नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते योगेश क्षीरसागर यांनी लगावला. येथील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, हणमंत शेळके, बांधकाम सभापती दीपाली क्षीरसागर, कुसूम शिरतोडे, दशरथ जाधव, मेघा शेळके, सचिन शेळके, कृष्णाबाई रासकर हे उपस्थित होते. योगेश क्षीरसागर म्हणाले, ‘लोणंद गावची १५ वर्षे सत्ता असताना विरोधी पक्षनेता असलेल्या सध्याच्या पार्टीने विकासकामांचे काय काय दिवे लावले. लोणंदचा विकास कितीतरी वर्षे पाठीमागे नेला. त्यामुळेच लोणंदच्या जनतेने एकदा नाहीतर दोन निवडणुकीत लोणंदची सत्ता आमदार मकरंद पाटील व आनंदराव शेळके-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती दिली आहे. आम्ही २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेचा दिलेला शब्द पाळणारच असून, लोणंदच्या जनतेला शुद्ध व मुबलक पाणी देण्यास कटिबद्ध आहोतच. त्या दिशेने आमची वाटचाल सुरूच आहे.लोणंद नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आमदार मकरंद पाटील व नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार लोणंद गावामध्ये राबवल्या जात आहेत. त्याद्वारे विविध योजनांसाठी करोडो रुपयांचा निधी नगरपंचायतीस प्राप्त झाला आहे. त्यामुळे आमदार केवळ प्रसिद्धीसाठी विकासकामे करीत नसून जी कामे करत आहेत त्याचे श्रेय आम्ही घेत आहोत.’काँगे्रसचे विरोधी पक्षनेते असलेल्यांना प्रशासन कसे चालते याची अपुरी माहिती असल्यानेच त्यांनी लोणंदच्या पाण्याचा टाकीसंदर्भातील आपले अज्ञान स्वत:हूनच उघड केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीनुसार व आमदार मकरंद पाटील यांच्या सूचनेनुसार गणेश मंदिरामागील जलकुंभाच्या ठिकाणी नवीन जलकुंभ उभारणे व त्याला रायजिंग मेनलाईन नव्याने जोडून लोणंद मधील गोठेमाळ व इतर परिसरामध्ये पाणीपुरवठा करणे असा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला आहे.’ (वार्ताहर)
आरोप बालीशपणापोटी...
By admin | Published: April 09, 2017 11:40 PM