सातारा : कूल जिल्हा ओळख असलेला सातारा कडक उन्हाची चटके सहन करीत आहे. साताऱ्यातील पाऱ्याने चाळीस अंशांची पातळी गुरुवारी ओलांडली आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागू होत आहे. त्यामुळे रस्ते ओस पडत आहेत.सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सातारा जिल्हा विपुल वनसंपत्तीमुळे थंड म्हणून ओळखला जातो. येथील महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी जगभरातील पर्यटक येतात; पण याच जिल्ह्यातील माण, खटावमध्ये उन्हाचा पारा वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पारा ३९ अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. दोन दिवसांपासून तो चाळीस अंश सेल्सिअस दाखवीत होता. त्यामुळे सातारकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी शीतगृहे, रसवंतीगृहे भरलेली पाहायला मिळत आहेत. या उन्हाचा फटका पशुपक्ष्यांनाही बसायला लागला आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. दरम्यान, काही सामाजिक संस्था व प्राणी, पक्षी मित्र संघटनांनी वनक्षेत्रात पाण्याचे टँकर नेऊन पाणवठ्यात पाणी सोडत आहेत.
साताऱ्यातील पाऱ्याने ओलांडली चाळिशी
By admin | Published: March 30, 2017 11:24 PM