रशीद शेख - औंध -छत्रपती शिवरायांचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भोसले गावच्या हद्दीत येत असलेला हा रस्त्यांचा चौक व त्याठिकाणी असणारे आंब्याचे झाड यावरून तयार झालेला एसटी बसचा थांबा म्हणजेच चौकीचा आंबा होय.चौकीचा आंबा म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे वडूज-रहिमतपूर व औंध-फलटण रोड. चार रस्ते मिळून याठिकाणी मोठा चौक तयार झाला आहे. याठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडामुळे या चौकाला ‘चौकीचा आंबा’ अशी ओळख मिळाली. खरे तर याठिकाणी भोसरे ग्रामस्थांची शेतजमीन आहे. या शिवारास पूर्वी ‘चौकीचे शिवार’ असे नाव होते. पुढे वडूज-रहिमतपूर रस्त्याचे काम झाल्यानंतर तेथे असणाऱ्या आंब्याच्या झाडामुळे त्या बसथांब्याला चौकीचा आंबा नाव पडले. पूर्वी सायंकाळी सहानंतर या शिवारात कोणी फिरकत नसे. त्याकाळी भोसरे येथील दिवंगत शंकर जाधव (भाऊजी) यांनी येथे हॉटेल सुरू केले. यानिमित्तानं प्रवाशांना एक हक्काचं ठिकाण मिळालं. आता चौकीचा आंबा या ठिकाणाला बाजारपेठेचे स्वरूप आले आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी मोठा बाजार भरतो. या बाजारासाठी अंभेरी, कोकराळे, जायगाव, लोणी, भोसरे, जांब, जाखणगाव इत्यादी भागातील शेतकरी खरेदी विक्रीसाठी-मोठ्या प्रमाणात येतात. तसेच शनिवारी सकाळी लवकर जनावरांचा बाजार भरतो. म्हसवड, पिलीव, कऱ्हाड, पाटण, वडूज, पुसेसावळी, खातगुण अशा खटाव तालुक्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणाहूनही ग्राहक या बाजाराला येतात. मोठी आर्थिक उलाढाल जनावरांच्या या बाजारात होते. परिसरातील वाड्यावस्त्यांवरील लोकांना हक्काची बाजारपेठ याठिकाणी तयार झाली आहे.चौकीचा आंबा या ठिकाणी दरवर्षी जनावरांची जंगी यात्रा व प्रदर्शन चैत्र पौर्णिमेला भरते. आजमितीस याठिकाणी खते, बी-बियाणे, हॉटेल्स, बँका, कॉम्प्युटर सेंटर, मेडिकल, हार्डवेअर गॅरेज, किराणा स्टोअर्स तसेच सर्व शेतीपूरक व जीवनावश्यक वस्तू याठिकाणी उपलब्ध आहेत. भलीमोठी पेठच या रस्त्याच्या बाजूला तयार झाली आहे. हा बाजार तालुक्यात प्रसिद्ध आहे.निर्मनुष्य ठिकाण बनलं वर्दळीचंपूर्वी याठिकाणी सायंकाळी सहानंतर जायला लोक घाबरत होते. मात्र, आता बाजारपेठ दळणवळणाची सोय झाल्यामुळे याठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. वडूज-रहिमतपूर, सातारा, औंध, पुसेगाव याठिकाणी येथून दर एका तासाला एसटी बस आहे. तसेच खासगी वाहतूकही आहे. पुन्हा बहरले आंब्याचे झाडया चौकातील वर्षानुवर्षे प्रत्येक घटनेची साक्ष देणारा आंबा वटला होता. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी तो कोसळून पडला. ज्या आंब्याच्या झाडाने ओळख निर्माण करून दिली तो ‘चौकीचा आंबा’ ही ओळख जिवंत ठेवण्यासाठी भोसरे ग्रामस्थ व व्यावसायिकांनी त्याच ठिकाणी आंब्याचे झाड लावले आहे. आता ते झाडही दिमाखात वाढत आहे.
चौकी नावाच्या शिवाराला आंब्यानं दिली ओळख
By admin | Published: March 11, 2015 10:51 PM