म्हसवड : कोरोना काळात स्वस्त धान्य दुकानदार सर्वसामान्यांना धान्य वाटप करत होते. यामध्ये माण तालुक्यातील एका दुकानदाराचा मृत्यू झाला असून, चाळीस बाधित झाले आहेत. शासनाने दुकानदार संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा १ मेपासून तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदार संपावर जातील, असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ राॅकेल विक्रेता संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवानराव गोरे यांनी दिला आहे.
गोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार जिल्ह्यात, तसेच माण तालुक्यात झाला आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लावली आहे, परंतु रास्तभाव दुकानदारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण न देता, धान्यवाटप करावे लागत आहे. धान्यवाटप करताना दुकानदारही बाधित होत आहेत. त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणेसाठी लाखो रुपये खर्च करावे लागले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांऐवजी दुकानदारांच्या अंगठ्याने धान्यवाटप करण्यास परवानगी द्यावी. दुकानदारांना दुकानदारांना विमा संरक्षण, पीपीई किट मिळावे.
निवेदनावर संजय राजमाने, डी.व्ही. कोरडे, अभिजीत कट्टे, जे.एस. काळे, एस.आर. कट्टे, डी.एन. शेंडे, एस.पी. मगर, व्ही.जी.पवार, बी.एल. शेंडे, टी.एस. कोकरे यांच्या सह्या आहेत.