पाटण : अनेक वर्षे आब्रग गावातील जनता स्वस्त धान्य दुकानातील जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी मोरगिरी येथे हेलपाटे घालत होती. आता मात्र ही समस्या सुटली आहे. येथील बचत गटाने स्वस्त धान्य दुकान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रारंभही करण्यात आला आहे.
पाटण तालुक्यातील आब्रग गावातील गुरुदत्त महिला बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन गावात स्वस्त धान्य दुकान आणण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी हे दुकान मोरगिरी येथे चालवले जात होते. सरपंच संतोष गुरव आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर पवार यांच्या सहकार्यातून पाटण येथील तहसील कार्यालयात याबाबत विनंती अर्ज केला. त्यानंतर महिला बचत गटाला स्वस्त धान्य दुकान चालवण्यास परवानगी मिळाली.
तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्रफुल्ल जाधव, बचत गट अध्यक्षा जयश्री पवार, सचिव अनिता पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी आंब्रग येथे स्वस्त धान्य दुकान चालवण्याचा प्रारंभ केला.
स्वस्त धान्य घेण्यासाठी ग्रामस्थांना तीन किलोमीटर पायपीट करत मोरगिरी येथे जावे लागत होते. हे जाणूनच श्री गुरुदत्त महिला बचत गट यांनी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानासाठी राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यामार्फत पाठपुरावा केला आणि त्याला यश मिळाले. या दुकानाचे उद्घाटन पुरवठा निरीक्षक प्रफुल्ल जाधव, सरपंच संतोष गुरव व शिवसेना शाखाप्रमुख शंकर पवार तसेच महिला बचत गटाच्या सर्व सदस्य महिला यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो
आंब्रग येथील बचत गटातर्फे सुरू केलेल्या स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन पुरवठा निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : अरुण पवार)