पाचवड : ‘वर्षानुवर्षे रखडलेली कामे मार्गी लागल्यानंतर ती कामे आपणच केली, असे लोकांना भासवून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटणे हे विरोधकांना न शोभणारे आहे,’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. आमदार मकरंदआबा पाटील यांच्या अथक परिश्रमातून व नाबार्डच्या योजनेतून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते पाचवड-चिंधवली रस्ता व कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अजितदादा पवार म्हणाले, ‘आमदार मकरंदआबांचे काम हे सर्व मतदार संघात सर्वश्रूत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे संयुक्त सरकार असताना या पुलासाठी मकरंदआबांनी अथक परिश्रम घेतलेले मी स्वत: पाहिले असून, या कामाचे श्रेय घेण्याचे काम विरोधकांनी जाणीवपूर्वक केले.’ पुढे बोलताना ते म्हणाले, ‘केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले असून, राज्यातील शेतकरी या सरकारच्या कचखाऊ धोरणांमुळे आज मेटाकुटीला आला आहे. लाखोंचा पोशिंदा असलेला शेतकरी कधी संपावर गेला नव्हता परंतु आज शेतकऱ्यांनीच संपावर जायचं ठरवल्याने या सरकारचं डोकं लवकरच ठिकाणावर येणार आहे,’ असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘ज्यांना दररोज पक्ष बदलण्याची घाई त्यांना वाई तालुक्यातील मातब्बर नेते कळाले नाहीत. सोयीनुसार स्वार्थ आणि सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या व विरोधक म्हणून आमच्यावर तोंडसुख घेऊन प्रसिद्धीत राहण्याचा खटाटोप करणाऱ्यांना उद्या आपण कुठे असाल, असा सवाल करत आघाडी सरकारच्या विकासकामांना भाजपाच्या दोरीला बांधणारे माजी खासदार गजानन बाबर यांनी एकदा समोरासमोर यावे मग त्यांना राष्ट्रवादी काय आहे, हे आम्ही दाखवून देऊ,’ असा घणाघात आमदारांनी यावेळी केला. (वार्ताहर) पुलाच्या डागडुजीत कारकिर्द घालवली आमदार मकरंद पाटील यांनी चिंंधवलीच्या पुलाचे १० कोटी २० लाखांचे काम नाबार्डच्या योजनेअंतर्गत मंजूर करून आणले याचा दाखला देत चिंधवली गावच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी गावात ५०० मीटर रस्ता सोडून साधे संडासही बांधले नाही त्यांनी १० कोटींच्या कामाचे श्रेय घेणे म्हणजे मोठी अतिशयोक्ती असल्याचे सांगितले. ज्या माजी मुख्यमंत्र्यांनी या पुलास मंजुरी दिली, असे म्हटले जाते ते उद्घाटनास का हजर नव्हते याचे उत्तर त्यांनी प्रथम जनतेस द्यावे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रतापराव पवार, रजनीताई भोसले-पाटील, अनिल जगताप, महादेव मस्कर, नितीन पाटील, मनोज पवार, मंगेश धुमाळ, संगीता मस्कर, शारदा ननावरे उपस्थित होते.
श्रेय लाटणे विरोधकांना अशोभनीय
By admin | Published: April 14, 2017 10:13 PM