कोपर्डे हवेली : दारिद्र्य रेषेखालील, गरीब व गरजू लोकांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून असणाऱ्या महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत. तर काही लाभर्थ्यांना कनेक्शन मिळत असतानाच कोपर्डे हवेली येथे तातडीने कनेक्शन देतो, असे म्हणून महिलांना हजारो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एका एजंटाने हा कारभार केला असून, पैसे घेतल्यापासून तो गावात फिरकलेलाच नाही.केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान उज्ज्वला मोफत गॅस कनेक्शन ही महिलांसाठी योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी या योजनेचे काही निकष आहेत.
लाभार्थी होण्यासाठी एका कुटुंबातील रेशन कार्डवर पूर्वीची गॅस कनेक्शची नोंद नसावी, ही महत्त्वाची अट आहे. तर कागदपत्रामध्ये लाभार्थी महिलेचे आधारकार्ड, रेशनकार्ड, फोटो, बँकेचे पासबुक आदींचा समावेश आहे. जर एखादे गाव डोंगरालगत किंवा वन विभागालगत असल्यास संपूर्ण गावासाठी वनविभागाचा दाखला लागतो.
याची पूर्तता स्वत: लाभार्थ्याने नजीकच्या गॅस एजन्सीकडे करून लाभ घेऊ शकतो. या योजनेला मध्यस्थांची गरज नसताना गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी उज्ज्वला गॅस योजनेचा एजंट आहे, असे भासवून लाभार्थ्यांचा फायदा घेऊन एकाने हजारो रुपयांचा गंडा घातला आहे.
या योजनेचा लाभ अनेकांनी कागदपत्रांची पूर्तता करून मोफत घेतला असतानाच कोपर्डे हवेली गावातील काही लाभार्थ्यांना लाभ मिळण्याऐवजी तुम्हाला तातडीने गॅस मिळवून देतो म्हणून हजार रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतचा गंडा घातला आहे.
त्यामध्ये गावातील अनेकांचा समावेश आहे. यापूर्वी या एजंटने दोन लोकांना पाचशे रुपये घेऊन गॅस दिले होते, त्यामुळे ग्रामस्थांचा विश्वास बसला. परिणामी, अन्य ग्रामस्थांनी त्याला पैसे दिले.
उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन मोफत असताना तुम्ही पैसे कसे घेता,ह्ण असे काही ग्रामस्थांनी संबंधिताला विचारले असता, तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत,ह्ण असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी त्याला पैसे दिले. ग्रामस्थांचे पैसे घेऊन संबंधित एजंट गावातून निघून गेला. अद्याप तो परत फिरकलेला नाही. ग्रामस्थांना गॅस कनेक्शन मिळाले नाही. तसेच पैसेही परत मिळालेले नाहीत. त्याच्या मोबाईलवरही संपर्क होत नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे.सिलिंडरसह गॅस शेगडीचाही लाभपंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ मिळतो. लाभार्थ्याला मोफत कनेक्शन मिळते. एक सिलिंडर मिळतो. तसेच शेगडी, रेग्युलेटरसह इतर साहित्यही मिळते. त्यामुळे ज्यांच्याकडे गॅस नाही, अशा लाभार्थ्यांसाठी ही योजना लाभदायक आहे. मात्र, त्यामध्येही आता एजंटांनी शिरकाव केल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेसाठी मी तीनशे रुपये एजंटकडे तीन महिन्यांपूर्वी दिले आहेत. आठवड्यात गॅस कनेक्शन मिळेल, असे त्याने सांगितले होते. तसेच त्या पैशाची पावतीही दिली नव्हती. अद्याप मला गॅस मिळालेला नाही. माझ्यासह इतर ग्रामस्थांनीही तीनशे, पाचशे, हजार, दीड हजार रुपयाप्रमाणे संबंधित एजंटकडे पैसे भरले आहेत.- मंगल बळवंतराव चव्हाणगृहिणी, कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड