महाबळेश्वर : येथील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या ग्राहकाने खात्यात जमा करण्यासाठी दिलेली रक्कम रोखपालाने स्लीपवर शिक्का मारून घेतली. पण ती खात्यात जमाच केली नाही. ग्राहकाला पैसे जमा झाल्याचा संदेश न मिळाल्याने त्याने बँकेत जाऊन चौकशी केली असता निम्मी रक्कम भरण्यात आली. शेवटी दहा दिवसांच्या तगाद्यानंतर पूर्ण रक्कमेचा भरणा करण्यात आला. मात्र, याबाबत तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. डिजिटल युगात बँकिंग प्रणाली हा आर्थिक व्यवहारांचा अविभाज्य भाग झाला आहे. शासनाच्या विविध योजनांचे अनुदानही बँक खात्यातच जमा होते. त्यामुळे बँकेत खाते असणे अनिवार्य झाले आहे. विश्वासार्हता म्हणून कोट्यवधी खातेदार पतसंस्थांऐवजी राष्ट्रीयकृत बँकांना प्राधान्य देतात. पारदर्शकता येण्यासाठी ग्राहकांनाही ‘एसएमएस’द्वारे त्यांच्या खात्यातून होणाऱ्या उलाढालीची माहिती दिली जाते. या सुविधेमुळेच महाबळेश्वरमधील एका राष्ट्रीयकृत बँकेतील गैरव्यवहार टळला. याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील रोखपालाने येथील एका खातेदाराचे पैसे बँकेत चलन भरून शिक्का देऊन भरण्यासाठी ताब्यात घेतले. परंतु ती रक्कम त्याच्या खात्यात जमा केली नाही. तीन दिवसांनंतरही पैसे जमा झाल्याचा संदेश ग्राहकाला मोबाईलवर आला नाही. त्यामुळे तो याची विचारपूस करण्यासाठी बँकेत गेला असता. रोखपालाने ‘निम्मे पैसे देतो उरलेले नंतर देतो,’ असे त्या ग्राहकाला सांगितले. त्यामुळे संतप्त ग्राहकाने याबाबत तक्रार व्यवस्थापकाकडे केली असता व्यवस्थापकाने याबाबत कोणतीही कारवाई न करता, ‘असे पुन्हा होणार नाही,’ याची ग्वाही दिली. तब्बल दहा दिवसांच्या पाठपुराव्यानंतर त्याच्या खात्यात त्याचे पैसे जमा झाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या संबंधित ग्राहकाने पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तक्रार करून ही काहीच होत नसल्याने अशिक्षित ग्राहकाने तक्रार करायची कोठे, असा प्रश्न येथे ग्राहकाला भेडसावत आहे. (प्रतिनिधी)
एका ‘एसएमएस’ने वाचविली फसवणूक
By admin | Published: March 05, 2017 11:21 PM