ढेबेवाडी :
महसूल प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाने ढेबेवाडी बसस्थानकाजवळ रस्त्यावर फिरणाऱ्या सर्वांचीच अचानकपणे कोविड तपासणी मोहीम राबविली. शुक्रवारी सकाळी राबविलेल्या या मोहिमेत चार जण कोरोनाबाधित आढळल्याने ढेबेवाडी विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे. ‘ढेबेवाडीत या आणि मोफत तपासणी करून जा’ या प्रशासनाच्या भूमिकेमुळे मोकाट फिरणाऱ्या अनेकांनी शुक्रवारी दुपारनंतर ढेबेवाडीकडे पाठ फिरवली. मात्र, सकाळी कामावर जाणाऱ्यांसह उगाचच भटकंती करणाऱ्यांना तपासणीचा दणका बसला.
महसूल विभागाचे प्रतिनिधी, पोलिसांचा शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मोठा ताफा आणि आरोग्य विभागाची रुग्णवाहिका अचानकपणे आपल्या सर्व लवाजम्यासह ढेबेवाडी बसस्थानकानजीक असलेल्या मुख्य चौकात दाखल झाली. एखाद्या चित्रपटातील चित्रीकरणासारखा सेट उभारून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचारी, दुचाकीस्वार असो की चारचाकी, कुणी सापडले की, त्याला खुर्चीत बसवून त्याची तपासणी केली जात होती.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच तळमावले, ढेबेवाडी येथील व्यापाऱ्यांनी १० दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करून बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. जनतेतून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. औषध दुकाने आणि दवाखाने या अत्यावश्यक बाबीवगळता सर्वत्र शुकशुकाट आहे.
सुज्ञ नागरिकांचा बंदला चांगला प्रतिसाद
मिळत असला तरी आसपासच्या गावांतून काहीही कारण नसताना भटकणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही, हे लक्षात आल्यावर शेवटी ढेबेवाडी पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सणबूरच्या मदतीने ढेबेवाडी एसटी स्टॅण्ड चौकामध्ये कडक नाकेबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची कोरोना चाचणी सुरू केली. याचा अपेक्षित परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे.
पाटण तालुक्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असतानाच कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे, मुंबई व अन्य शहरांतून चाकरमानी गावोगाव परतू लागले आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यातच हे चाकरमानी काही स्वस्थ बसायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर महसूल, पोलीस व व्यापारी आणि स्थानिक समित्यांनी जनता कर्फ्यू पुकारूनही या भटक्यांचा वावर कमी होत नव्हता. त्यावर हा इलाज गुणकारी ठरत आहे.
(कोट..)
ढेबेवाडी तळमावले येथील व्यापारी बांधवांनी स्वतःहून जनता कर्फ्यू पुकारल्याने बाजारपेठेत गर्दी होत नाही. मात्र, विनाकारण फिरणाऱ्यांवर वचक बसला पाहिजे म्हणून कोरोना तपासणी मोहीम राबविली. त्यामध्ये चार जण बाधित सापडले. यापुढेही ही मोहीम चालूच राहणार असल्याने विनाकारण कुणीही बाहेर पडू नये.
-संतोष पवार, सहायक पोलीस निरीक्षक, ढेबेवाडी
फोटो आहे...
२३ढेबेवाडी
ढेबेवाडी बसस्थानकाजवळ शुक्रवारी रस्त्यावर फिरणाऱ्या सर्वांचीच अचानकपणे कोविड तपासणी मोहीम राबविली. (छाया : रवींद्र माने)