कऱ्हाड : विद्यानगर येथील डॉ. वैभव पाटील यांच्या स्वराली या चार वर्षीय बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी गुरुवारी कोल्हापूर व पाटण येथे दोन तपास पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. स्वराली बुधवारपासून गायब झाली असून, अज्ञातांनी तिचे अपहरण केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने कऱ्हाड शहर पोलिस तपास करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर येथे राहत असलेल्या डॉ. वैभव पाटील यांची चार वर्षांची मुलगी स्वराली ही नेहमीप्रमाणे बुधवार, दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात वाळूमध्ये खेळत होती. मुलगी खेळत असल्याने तिची आई घरात काम करीत होती. काम आटोपल्यानंतर काही वेळाने अंगणात मुलगी खेळत आहे का हे पाहण्यासाठी स्वरालीची आई घराबाहेर आली व तिने स्वरालीचा इतरत्र शोधाशोध केली. मात्र, ती कोठेच आढळली नाही. अखेर स्वरालीच्या आईने पती डॉ. वैभव यांना फोन करून स्वरालीचे अपहरण झाले असल्याची माहिती दिली. त्यानंतर बाहेर गेलेले वडील तत्काळ मित्रासोबत घरी आले व त्यांनी स्वरालीचा तत्काळ परिसरात शोधाशोध केला. मात्र, ती कोठेच आढळली नाही. अखेर स्वराली हरवली असल्याची फिर्याद वडील डॉ. वैभव पाटील यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत दिली. स्वरालीचे अपहरण केले असल्याचा संशय स्वरालीचे वडील वैभव यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर कऱ्हाड शहर पोलिसांनी श्वान पथकाच्या सा'ाने बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरपरिसरात तपास केला. मात्र, घरापासून काही अंतरावर श्वान पथक जाताच ते मुख्य रस्त्यावर घुटमळे.याबाबत स्वरालीचे वडील वैभव ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, ‘ती नर्सरीमध्ये शिक्षण घेत असून, बुधवारी तिच्या अपहरणानंतर कोल्हापूर, बेळगाव, पुणे, सांगली तसेच इस्लामपूर येथे राहत असलेल्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. त्यातून गुरुवारी दिवसभर स्वरालीचा इतरत्र शोधाशोध घेतला असता ती कोठेच आढळली नाही.’ दरम्यान, स्वरालीला पाटण येथे पाहिले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचे एक पथक पाटण तसेच दुसरे पथक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करत आहेत.
स्वरालीसाठी तपास पथके रवाना
By admin | Published: February 10, 2017 12:31 AM