बामणोली : दरवर्षी ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने हुल्लडबाज तरुणांची पावले कास-बामणोलीकडे वळत असतात. धांगडधिंगा करणाऱ्या तरुणांमुळे निसर्गाची हानी होते. ती रोखण्यासाठी ३१ डिसेंबरला हुल्लडबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कास, बामणोलीतील ग्रामस्थ रात्रगस्त घालणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने कास-बामणोली परिसरात ओल्या पार्ट्या करण्याचे प्रस्त वाढत चालले आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना मद्य रिचवणारे असंख्य तरुण या परिसरात येत असतात. जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कासच्या हिताच्या दृष्टीने हे मानहानीकारक आहे. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबरला येथे येणाऱ्या आंबट शौकिनांवर ग्रामस्थांची करडी नजर असणार आहे. पार्ट्या करताना तरुणाई आढळल्यास त्यांना थेट पोलिसांच्याच स्वाधीन केले जाणार आहे. कास, कासाणी, आटाळी व एकीव गावांच्या संयुक्त वनव्यवस्थापन समित्या व प्रतापसिंहराजे भोसले सामाजिक विकास संस्था, पेट्री यांनी ३१ डिसेंबरला संयुक्तपणे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात त्या दिवशी वणवा लावणे, रस्त्यावर धांडगधिंगा घालणे, कास तलावाच्या काठावर मद्याच्या बाटल्या फोडणे, बेफामपणे गाडी चालविणे, अशी कृत्ये करताना कोणी आढळल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. कास तलाव परिसरात सध्या दररोज जेवणावळी, गाडीतील गाण्याच्या तालावर नाचगाणी केली जातात. ठोसेघर धबधबा व कासच्या फुलांचा हंगाम संपल्यावर वनविभाग, पोलिसांचा बंदोबस्त कमी झाला. त्यामुळे हौसी पर्यटकांना संपूर्ण परिसर मोकळा सापडला. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. (वार्ताहर) सुरक्षारक्षक प्रथम देणार समज कास, बामणोली, कासाणी, एकीव, आटाळीच्या संयुक्त व्यवस्थापन कमिटी व प्रतापसिंहराजे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ३१ डिसेंबरला रस्त्यालगत सुरक्षारक्षक उभारणार आहेत. ते पर्यटकांना समज देणार आहेत. रस्त्याच्या कडेला चुली पेटविणे, धांगडधिंगा घालणे, असे प्रकार आढळल्यास संबंधितांना तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे, त्यामुळे तरुणांनी या ठिकाणी हुल्लडबाजी करू नये, अशी माहिती कास, बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली. गेले महिनाभर कास-बामणोलीच्या रस्त्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणींने अक्षरश: धिंगाणा घातला आहे. अनेक युवक-युवती महाविद्यालयाच्या गणवेशात दुचाकी बेफामपणे चालवून शाळकरी मुले, पादचारी यांना भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. ३१ डिसेंबरला आमच्या मंडळाचे कार्यकर्ते धिंगाणा घालणाऱ्या व गैरकृत्य करणाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन करणार आहोत. - यशवंत साळुंखे, अध्यक्ष, प्रतापसिंहराजे स्थानिक विकास संस्था, पेट्री
‘चिअर्स’ला ‘चांगभलं’ने प्रत्युत्तर !
By admin | Published: December 28, 2014 9:55 PM