आदर्की (सातारा) : उसाच्या शेतातील रसायन मिश्रित पाणी मेंढ्यांनी पिल्यानंतर काही वेळातच दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना फलटण तालुक्यातील कापशी येथे गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजता घडली. यामध्ये सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबतची माहिती अशी, आदर्की बुद्रुक येथील संतोष आप्पा येळे, बापू दादू गुळदगड (खराडेवस्ती) यांच्या मालकीच्या मेंढ्या कापशी येथील ओढ्याशेजारुन घरी घेऊन गेले होते. दरम्यान, नजीकच एका शेतकºयाने ऊस शेतीची नुकतीच मशागत केली होती. या ऊस पीकाची वाढ चांगली व्हावी, म्हणून रासायनीक खत टाकले होते. त्यानंतर त्या शेतकºयाने या उसाला गुरुवारी पाणी सोडले होते. नेमके याच वेळी उसातील सरीमध्ये साठलेले पाणी तीव्र उन्हाचा तडाख्याने व्याकुळ झालेल्या मेंढ्यानी पिले.
यावेळी मेंढपाळही बरोबरच होते. पण हे पाणी रसायन मिश्रित असेल याची कोणतीही कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळे पाणी पिल्यानंतर तत्काळ तडफडणाºया मेंढ्या पाहून तेही हतबल झाले.
सर्व मेंढ्या उपचारापूर्वीच मृत्यूमुखी पडल्या आहेत. या पाण्याची कमी तीव्रता असणाºया अजून काही मेंढ्या आहेत. त्यांच्यावर आदर्की बुद्रुक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार फाळके हे उपचार करीत आहेत.
या घटनेनंतर अनेक जणांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. या अचानक झालेल्या घटनेने हतबल झालेल्या मेंढपाळला दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष स्थळाची पहाणी करून तात्काळ मदत करावी, अशी मागणी आदरकीसह परिसरातून होत आहे.
आदर्की बुद्रुक येथील मेंढपाळाच्या दहा मेंढया दगावल्या असून शेतातील पाणी पिल्या पण त्यामध्ये कोणती औषधे, खते टाकली होती ते समजू शकले नाही. मेंढ्यांना विषबाधा झाली आहे. सात ते आठ मेंढ्यांवर उपचार सुरु आहे.
डॉ. नंदकुमार फाळके, पशुवैद्यकीय अधिकारी आदर्की बुद्रूक, ता . फलटण