अजित जाधवमहाबळेश्वर : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साधारण ९ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. जो सोमवारी (२६ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास अचानक कोसळला, तर महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावरील अश्वारूढ पुतळा आजही सुस्थितीत उभा आहे. किल्ल्यावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्याला आज ६६ वर्षे ८ महिने २७ दिवस पूर्ण होत आहेत. सिंधुदुर्गचा पुतळा पडल्यानंतर प्रतापगडावरील पुतळ्याबाबत समाजमाध्यमात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणीही तितकीच रोमहर्षक आहे. शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामथ यांनी प्रतापगडावर बसविण्यात आलेला पुतळा विलेपार्ले येथे बनविला. हा पुतळा पंचधातूंचा बनविण्यात आला आहे. या पुतळ्याचे वजन ४ हजार ५०० किलो म्हणजे ४.५ टन आहे; परंतु हा पुतळा आतून भरीव नसून पोकळ आहे. हा पुतळा एवढा जड असल्यामुळे भाग सुटे करून एकूण सतरा भाग गडावर आणण्यात आले. याला तेथे वेल्डिंगच्या साह्याने जोडण्यात आले. त्यानंतर लाकडी क्रेन करून तो पुतळा चौथऱ्यावर ठेवण्यात आला.
यामध्ये घोडीचा एक पाय हवेत असलेला दिसतो, याचा अर्थ असा होतो की, घोडीवर बसलेल्या राजाचा मृत्यू नैसर्गिक आजारपणामुळे झाला आहे, तर काही घोड्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत असतात. त्यावर बसलेला राजा लढाईत मारला गेलेला असतो. घोड्याचे चारही पाय जमिनीवर असल्यास तो राजा समोरच्या राजाला शरण गेलेला असतो.
पुतळ्याची उंची ३६ फूट पण का?पुतळ्याची उंची ३६ फूट आहे. घोड्याच्या पायापासून ते तलवारीच्या टोकापर्यंत एकूण १६ फूट उंच आहे. चौथऱ्यापासून ३६ फूट आहे. चौथरा २० फुटांचा आहे. शिवरायांनी ३६५ किल्ल्यांपैकी ३६ किल्ले बांधले आहेत. ३६ वर्षांत ३६ किल्ले बांधले म्हणून पुतळ्याची उंची ३६ फूट ठेवण्यात आली.
पुतळ्याबाबत दोन पत्रांचा संदर्भप्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासंदर्भात ब्रिटिशांच्या ग्रंथालयामध्ये दोन पत्रे मिळाली आहेत. यामध्ये पहिल्या पत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तृत्व मोठे आहे, याची तुलना अलेक्झांडर यांच्याशीही होत नाही’, असा उल्लेख आहे. दुसरे पत्र शिवाजी महाराजांनी मोघल अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे, ‘या माझ्या मायभूमीचं रक्षण करणं, माझं कर्तव्य होय, या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो, तो कधीच यशस्वी झाला नाही.’ या दोन्ही पत्रांच्या प्रती पुतळा परिसरात लावण्यात आल्या आहेत.