कऱ्हाड (सातारा) : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य म्हणजे भाजपचे भाडोत्री सरकार आहे. ते भाजपवरच उलटणार आहे. शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत. मात्र, ते ‘मालकमंत्री’ असल्याचा आविर्भाव आणतात. त्यांच्यात अहंकार निर्माण झालाय. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे,’ अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.कऱ्हाडात रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. खासदार संजय राऊत म्हणाले, ‘सध्या सरकार असूनही भाजप हतबल आहे. हतबल होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहिलेला नाही. रशियात राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनीच नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपवर उलटल्याशिवाय राहणार नाही. भाजप भाडोत्री सैन्य घेऊन राज्य कारभार करीत आहे. त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. भाडोत्री कोणाचेच नसतात. ते बाजारबुणगे आहेत. हे भाडोत्री सरकार उलथवून टाकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत सत्ता उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून ज्याठिकाणी ज्या पक्षाची निवडून येण्याची क्षमता आहे तेथे त्या पक्षाचाच उमेदवार देण्याबाबतची चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. सत्तापालट करण्यासाठी जे योग्य असेल तेच आम्ही करू.’‘शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत; पण अहंकारामुळे ते ‘मालकमंत्री’ बनलेत. मी म्हणेल तसेच आणि मी म्हणेल तेच, अशी त्यांची हुकूमशाही सुरू आहे. दिल्लीत हुकूमशाही चालली नाही. मग गल्लीत काय चालणार. आगामी निवडणुकीत शंभूराज देसाईंचा निश्चितपणे पराभव होईल. आपल्या आजोबांना लोकनेते ही उपाधी का दिली होती, याचा विचार शंभूराज देसाई यांनी करावा. लोकनेत्यांचे कार्य आजही आदर्शवत आहे. मात्र, त्यांच्या नातवाने शेण खाल्ले. काँग्रेस पक्षात असूनही मराठी माणसासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. महाराष्ट्र उभारणीत त्यांनी योगदान दिले होते.
मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सैन्य हे भाजपचे भाडोत्री सरकार!, संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 7:02 PM