महाबळेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या सोबत आलो आहोत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपकडून ‘रिपाइं’चे नाव विशेषकरून घेतले जात नाही, अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. याबाबत उपमुख्यमंत्र्यांशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाबळेश्वर येथे मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) एकदिवसीय अभ्यास शिबिर पार पडले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, सीमा आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, केंद्रीय महासचिव अविनाश महातेकर, सरचिटणीस गौतम सोनावणे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.आठवले म्हणाले, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहायचे आहे. त्यांनीसुद्धा आपले नाव घेणे आवश्यक आहे. मात्र भाजप व एकनाथ शिंदे यांच्याकडून रिपब्लिकन पक्षाचे नाव विशेषकरून घेतले जात नाही.
रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. या पक्षाला टाळता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या सोबत आहोत. वैचारिक मतभेद असले तरी आमचे मिशन सत्तेपर्यंत पोहोचण्याचे आहे. सत्तेच्या माध्यमातून अनेक लोक भेटतात. त्यांची कामे होतात. त्यामुळे सत्ता आवश्यक असून लोकांना त्यामुळेच मदत होते. मात्र आपण चळवळीचे काम थांबवता कामा नये. चळवळ जिवंत ठेवली पाहिजे.अशोक गायकवाड यांनी आपल्या मनोगतात शिबिराचा उद्देश विशद केला. मान्यवरांकडूनही मनोगत व्यक्त करण्यात आले.‘त्या’ युतीचा परिणाम होणार नाहीवंचित बहुजन आघाडी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली असली तरी याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार नाही. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व आरपीआय ही आमची महायुती मजबूत आहे, असेही आठवले म्हणाले.
आठवले म्हणाले...
- मागासवर्गीय व आदिवासींना खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.
- सत्तेमधून सगळ्यांनाच सगळं मिळेल असं नाही. त्यामुळे केवळ चर्चा न करता काम करत राहा.
- मंत्री झाल्यामुळे आपण फार मोठे होतो असे काही नाही, मंत्रिपदे येतात अन् जातात, मात्र कार्यकर्ता हे पद कायम राहतं.
- छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आपल्याला पक्ष बांधायचा आहे.