कऱ्हाड : कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींच्या फाशीबाबत वर्षभरात निर्णय घेऊन असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अजून तीन महिने वाट पाहणार आहे. जर तीन महिन्यात आरोपींना फाशी शिक्षा झाली नाही तर १ जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांना स्वस्थ बसू देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दिला.येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात गुरूवारी ‘जागर युवा संवाद’ हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या.माजी मंत्री शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती शालन माळी, माजी सभापती देवराज पाटील, वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. बी. चौगुले, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, येत्या तीन महिन्यात कोपर्डी येथील अत्याचारातील आरोपींना फाशीची शिक्षा करावी. कऱ्हाडचं महाराष्ट्राच्या समाज व राजकारणात महत्वाचं स्थान आहे. या ठिकाणी महाविद्यालयीन युवती व युवकांशी संवाद साधत असताना त्यांच्याकडून स्त्रियांवरील अत्याचाराविषयी कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सुळे यांनी स्त्रीभ्रूण हत्या, युवतींची छेडछाड व अत्याचार, हुंडाबळी, युवक-युवतींच्या आत्महत्या या संदर्भात युवक युवतींशी संवाद साधला तसेच त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या. कार्यक्रमास महाविद्यालयातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.