सातारा : आशा सेविका आणि गटप्रवर्तक विविध मागण्यांसाठी १८ दिवसांपासून संपावर असून रविवारी संघटनेच्या वतीने दरे येथील गावी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. यावेळी आशांना ७ तर गटप्रवर्तकांना १० हजार मानधन वाढीसाह शासकीय सेवेत समायोजनची मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. यामुळे याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
याबाबत माहिती अशी की, दि. १८ आॅक्टोबरपासून आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आणि कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. तर १ नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबरच झालेल्या चर्चेत आशा सेविकेला ७ हजार आणि गटप्रवर्तकांना ६ हजार २०० रुपयांची वाढ तसेच दिवाळीला दोन हजारांचा बोनसला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे स्वागत फेडरेशनच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे व कृती समितीने केले. पण, गटप्रवर्तक या आशांच्या वरिष्ठ असल्याने त्यांच्या अपुऱ्या मानधनवाढीवर संघटनेने आक्षेप घेऊन १० हजार रुपये मानधनवाढ होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. त्यातच मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे गावी आले होते. त्यावेळी काॅ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ त्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी आशांना ७ हजार आणि गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत समायोजनसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मान्य केले. तसेच बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होईल, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीबद्दल आश्वासन दिले आहे. या निर्णयाचे स्वागत. पण, मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर होत नाहीतोपर्यंत संप सुरूच राहील असा निर्णय कृती समितीने घेतला आहे. तसेच संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.
- काॅ. आनंदी अवघडे