सातारा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रडणारे कधीच नाहीत. गेल्या २२ वर्षांत आम्ही त्यांच्या कामाची पद्धत पाहत आहोत. त्यांच्या कामामुळे कधीही त्यांच्यावर रडण्याची वेळ येणार नाही. मात्र, त्यांची वाढती लोकप्रियता खटकत असल्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असून ते अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे, असे मत राज्य पणन व उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर मला तुरुंगात जाण्याची भीती वाटते असे सांगत रडत बसले होते. या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर ते सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वभाव हा कधीही रडणारा माणूस नाही. कोणत्याही प्रसंगात धाडसाने सामोरे जाण्याची त्यांची पद्धत आहे. केवळ बदनामीसाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहे. असे कोणतेही काम त्यांनी केले नाही. ज्यामुळे त्यांच्यावर रडण्याची वेळ येईल.
लोकांसाठी काम करणारा, सर्वसामान्यांचा अनाथांचा नाथ असलेला अशी त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदेंची लोकप्रियता आणि जनतेचा त्यांना मिळणारा पाठिंबा याबरोबरच चोवीस तास लोकांसाठी ते उपलब्ध असतात. लोकांच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. ज्यांना ते पाहवत नाहीत ते अशी वक्तव्ये करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पैसे घेतल्यानेच ४० आमदार अजून टिकून आहेत, या वक्तव्यावरही मंत्री देसाई यांनी आमदारांनी पैसे घेतले असे केवळ बोलू नका, त्याचे पुरावे द्या. आम्ही सर्व चौकशीला समारे जाण्यास तयार आहोत. केवळ हवेतील गप्पा मारायच्या आणि बदनाम करायचे, ही पद्धत योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच याचा आमच्या कामाच्या पद्धतीवर किंवा सरकारच्या कामावरही काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी त्यांचा ज्या यंत्रणेवर विश्वास आहे त्या यंत्रणेकडे तक्रार करावी आणि चौकशी करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.