सातारा : मानधन नको, वेतन द्या, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे १० दिवसांपासून सातारा जिल्हा परिषदेसमोर राज्यव्यापी आंदोलन सुरु असून आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दरे गावी भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मानधनवाढीचा शब्द दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. पण, लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिकाही आंदोलकांनी घेतलेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मागील १० दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. तर यामध्ये संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुनीता आमटे या उपोषण करत आहेत. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपोषणस्थळीच सलाईन लावण्यात आलेली. तर संघटनेचे शिष्टमंडळ हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे गाव. गावच्या यात्रेनिमित्त आल्यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मानधनवाढीबाबत आश्वासन दिले. मात्र, लेखी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केलेली आहे. तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांचे दहाव्या दिवशीही उपोषण सुरूच होते.