कऱ्हाड : पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे रोग पसरू नयेत, यासाठी पालिकेने ‘फाईट द बाईट’ अभियान राबवले आहे. या अभियानांतर्गत शहरातील ४५ रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचा दररोज आढावा घेण्यात येत असून, शहरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे पाच व चिकुनगुनियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. शहरात या दोन्ही रोगांची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी विनाकारण भीती बाळगू नये, असे आवाहन पालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणबरोबरच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘फाईट द बाईट’ अभियान आरोग्य विभाग सातत्याने राबवत आहे. मे महिन्यापासून पालिकेने पुन्हा हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. मे, जून, जुलै या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाचे पाणी घराच्या परिसरातील कंटेनर, रिकामी भांडी यामध्ये साचून डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे या आजाराचे रुग्ण वाढतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे पालिकेने या अभियानांतर्गत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रीन टीम यांच्या सहकार्याने प्रयत्न केले आहेत. याबरोबरच शहरात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून, ग्रीनी व पालिकेचे आरोग्य कर्मचारी भेट देऊन पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील डासांची उत्पत्ती थांबवत आहेत. नागरिकांना सूचना करत आहेत. फ्रिजच्या पाठीमागील कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. याशिवाय रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील नामांकित अशा ४५ रुग्णालयांना ग्रीन टीमतर्फे रोज फोन करून तेथे या आजाराचे रुग्ण दाखल आहेत का, याची माहिती घेण्यात येते. १९ ऑगस्टअखेर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे पाच रुग्ण दाखल असून, चिकुनगुनियाचा केवळ एक रुग्ण दाखल आहे. तर जुलै महिन्यात पाच रुग्ण दाखल झाले होते.
- चौकट
‘त्या’ रुग्णांचा संबंध नाही!
शहर व परिसरात सुमारे तीनशे रुग्णालये असून, या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी तालुक्यातून व शेजारच्या जिल्ह्यातून तसेच अन्य तालुक्यांतून रुग्ण दाखल होत असतात. त्यांचा कऱ्हाडची संबंध नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
- चौकट
रुग्ण आढळल्यास माहिती कळवावी
आशा सेविकांमार्फत शहरात सर्वेक्षण करण्यात येऊन ज्या परिसरात रुग्ण सापडतील, त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. ही माहिती आरोग्य विभागाला कळविल्यानंतर परिसरात औषध फवारणी करण्यात येत आहे. रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी केले आहे.