सातारा: तालुक्यातील नागठाणे येथील बाजारमळा परिसरात राहणाऱ्या एका मुलाने आपल्या आईला पंजाबी ड्रेस घालू नको, तू साडीस नेस असे सांगितले मात्र, तिने साडी परिधान न केल्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. २३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.शेरु शौकत भोसले (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागठाणेतील बाजारमाळ परिसरात भोसले कुटुंबीय वास्तव्य करत आहे. मंगळवारी सायंकाळी शेरूची आई बोरीमशीन ही घरात होती. त्यावेळी तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. यावेळी शेरुने 'तू ड्रेस का घातला. साडी घाल,' असे सांगितले. मात्र, बोरीमशीन हिने पंजाबी ड्रेस न काढल्याचा शेरु याला राग आला.
रागाच्या भरात तो घरातून निघून गेला. याची माहिती बोरीमशीन हिने घरातल्यांना दिल्यानंतर शेरु याची शोधाशोध सुरु झाली. शोधाशोध सुरु असतानाच शेरु याने घरापासून जवळच असलेल्या एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
बोरगाव पोलिसांनी आत्महत्येचे कारण विचारल्यानंतर पोलीस अवाक झाले. आईने पंजाबी ड्रेस घातला म्हणून मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चेला उत आला. याबाबत सहायक फौजदार आर. एल. फरांदे हे अधिक तपास करत आहेत.