मोरेवाडीतील घटना : अपघात की आत्महत्या, याबाबत संशय; पोलिसांकडून तपास
लोकमत न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मोरेवाडी-कुठरे येथील लोकरे वस्तीत वृद्ध आईसह तिच्या तरुण मुलाचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसर हादरला आहे.
दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. अपघात की आत्महत्या, याबाबत संभ्रम असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
कमल ज्ञानदेव लोकरे (वय ६०) व सचिन ज्ञानदेव लोकरे (३८) असे होरपळून मृत्यू झालेल्या मायलेकराचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोरेवाडी-कुठरे येथील लोकरे वस्तीत ज्ञानदेव लोकरे हे पत्नी कमल व मुले सचिन आणि नितीन यांच्यासह वास्तव्यास आहेत. ज्ञानदेव यांच्या पायाची कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते सध्या रुग्णालयातच अॅडमिट आहेत, तर कमल याही आजारी होत्या. मोठा मुलगा सचिन हा ट्रकचालक होता, तर नितीनचे शिक्षण पूर्ण झाले असून तो घरीच असतो. वडिलांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे नितीन त्यांच्या सोबतीसाठी रविवारी रात्री रुग्णालयात गेला होता, तर घरात आई कमल व मुलगा सचिन हे दोघेजण होते. काही दिवसांपासून सचिन तणावाखाली होता. त्याचे नेमके कारण कोणालाही माहिती नव्हते. अशातच रविवारी रात्री सचिन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत असल्यामुळे शेजारच्या ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी येऊन त्याला समज दिली होती. पोलिसांनी समज दिल्यानंतर सचिन व त्याची आई हे दोघेही झोपी गेले. मात्र, सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांनी घराचा दरवाजा उघडला नसल्यामुळे शेजाऱ्यांनी आवाज दिला. घरातून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सचिन आणि त्याच्या आईचा भाजून मृत्यू झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे पेटविल्याचे दिसून येत होते. मात्र, ही आत्महत्या की अपघात याबाबत निश्चित काहीही सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार तपास करीत आहेत.
- चौकट
कोरोना तपासणीमुळे सचिन तणावाखाली!
सचिन हा ट्रकचालक होता. त्यामुळे वारंवार तो बाहेरगावी जायचा. दोन दिवसांपूर्वी त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवालही ‘निगेटिव्ह’ आला होता. मात्र, कोरोनाची तपासणी केल्यापासून तो तणावाखाली होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
फोटो : ०८केआरडी०६
कॅप्शन : मोरेवाडी-कुठरे, ता. पाटण येथील लोकरे वस्तीत आईसह मुलाचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. (छाया : रवींद्र माने)
फोटो : ०८सचिन लोकरे
फोटो : ०८कमल लोकरे