खटाव : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचा वाढता कहर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करताना पाहावयास मिळत आहे. मृत्यूचे प्रमाण गतवर्षीपेक्षा जास्त असल्यामुळे मात्र कोरोनाची दहशत ग्रामीण भागात अधिक दिसून येत आहे.
खटावमध्ये अशा काही हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ असणाऱ्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या दहाव्या दिवशी घरातील कर्त्या मुलावर कोरोनाने घाला घालून अवघ्या दहा दिवसांत आईनंतर मुलाला नियतीने हिरावले आणि घराचे घरपणच निघून गेले. नियतीच्या या घाल्यात मरणानंतरही काही आठवणी मात्र तशाच ताज्या राहिल्या.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त तर झालेच आहे, त्याहीपेक्षा एकाच कुटुंबातील सर्वच सदस्यांना कोरोना आपल्या कवेत घेत असल्यामुळे कुटुंबे कोरोनाने ग्रस्त होत आहेत, तर काहींनी या जगाचा निरोपही घेतला आहे. खटावमध्ये अशा दुःखद घटना मन सुन्न करून जात आहेत. नियतीच्या या खेळात मात्र कोरोनाचा कहर, त्यातच एकाच कुटुंबातील दोन-दोन व्यक्तीचे जाणे ही पोकळी कधीही भरून न येणारी आहेच. त्याचबरोबर हे मोठे धक्के कुटुंबातील सदस्यांना अवघ्या काही दिवसांत बसत असल्यामुळे नेमके काय घडते आहे, हे कळण्याच्या आतच दुःखाचा डोंगर या कुटुंबांवर पडत आहे.
कोरोनामुळे खटावमध्ये अनेक कुटुंबांतून कोणी ना कोणी सदस्य गमावला आहे. परंतु, आईच्या दहाव्याला मुलाची प्राणजोत मालवण्याच्या या दोन घटनांमुळे मात्र मन सुन्न झालेच. कोरोनाने मात्र बरंच काही शिकविले असले तरी अनेक कुटुंबे मात्र उद्ध्वस्त केली, हे मात्र तितकेच सत्य आहे.