प्रगती जाधव-पाटील ।सातारा : शाळेत अभ्यासाबरोबरच काही कला आत्मसात करता यावी, त्याद्वारे भविष्यातील करिअरचा मार्ग निश्चित करता यावा, या उद्देशाने येथील पेरेन्टस् असोसिएशन स्कूलमध्ये मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा स्वतंत्र विषय शिकविण्यात येत आहे. लिंगभेद बाजूला सारून शाळेतील विद्यार्थी स्वयंपाकाच्या कलेबरोबरच वेल्डिंगची कामेही शिकत आहेत. सक्षम अर्थाजनासाठीचे शिक्षण देणारी ही पहिली शाळा ठरली आहे.शाहूनगर येथील मंगळाई देवीच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य परिसरात पॅरेन्टस् असोसिएशन स्कूलचा मोठा विस्तार आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानात अडकून न पडता व्यवहारिक आयुष्यात आवश्यक असलेलं शिक्षण घ्यावं, असा आग्रह शाळेच्या अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांचा आहे. त्यामुळे महानगरांच्या धर्तीवर साताऱ्यातही विद्यार्थ्यांना हायटेक शिक्षण मिळावे, यासाठी त्या प्रयत्नशील असतात. याच धर्तीवर मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा खास विषय आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येतो. यात ऊर्जा-पर्यावरण, शेती-पशुपालन, अभियांत्रिकी आणि गृह-आरोग्य असे चार विभाग आहेत. विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकानुसार स्वतंत्रपणे याचे वर्ग होतात. याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन आलेल्या चार शिक्षकांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात मुलं लोणचं बनवायलाही शिकतात आणि मुली आवडीने वेल्डिंगचे धडे गिरवतात.गणेशमूर्ती, राखी अन् किल्ला प्रशिक्षणही शाळेतचपेरेन्टस् स्कूलमध्ये सर्व सण साजरे केले जातात. या सणासाठी लागणाºया वस्तू मात्र, विद्यार्थी शाळेतच तयार करतात. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांनी तयार केलेली उत्कृष्ट गणेशमूर्तीची शाळेत प्रतिष्ठापना करण्यात येते. याबरोबरच नागपंचमीसाठी आवश्यक नाग, राखी, आकाश कंदील बनवले जातात. यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. दिवाळीची सुटी लागण्यादिवशी प्रत्येक वर्ग दगड माती गोळा करून किल्ला बनविण्याचा आनंद घेतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्यामुळे शाळेतील विद्यार्थी परस्परांना स्वत: तयार केलेले गिफ्ट देतात, हे विशेष!
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून अनुभवावर आधारित शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला विद्यार्थी अन् पालकांचा प्रतिसाद मिळत आहे.- स्नेहा टाकेकर, प्राचार्या