सातारा : बसस्थानकाच्या फलाटावरील स्लॅबचे सिमेंटचे पोपडे अचानक कोसळून फलाटावर उभ्या असलेल्या दोन लहान मुलांना गंभीर दुखापती झाल्या. फलाट क्र. ७ वर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शुक्रवारी सायंकाळी बसस्थानकात मोठी धांदल उडाली.चैतन्य गणेश चव्हाण (वय दीड वर्ष) आणि आर्या गणेश चव्हाण (वय ३ वर्षे) अशी जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत. गणेश नामदेव चव्हाण (वय ३५) आणि त्यांच्या पत्नी रूपाली गणेश चव्हाण (वय २८) आपल्या मुलांना घेऊन सांगवी (ता. कोरेगाव) येथे जाण्यासाठी फलाट क्र. ७ वर उभे होते. या फलाटावरून सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात. सायंकाळच्या सुमारास फलाटावरील स्लॅबला केलेल्या गिलाव्याचा काही भाग कोसळून त्याचे मोठे पोपडे उंचावरून खाली पडले. चैतन्य आणि आर्याच्या डोक्यात हे तुकडे कोसळल्याने त्यांच्या आईवडिलांसह फलाटावरील प्रवासी घाबरून गेले. फलाटावर एकच धावपळ उडाली. संपूर्ण स्लॅबच कोसळते की काय, अशा भीतीने प्रवासी धावत सुटले.दरम्यान, सुरुवातीस एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही काय करावे हे सुचले नाही. गणेश आणि रूपाली चव्हाण यांनी जखमी चैतन्य आणि आर्याला रिक्षात बसवून तातडीने खासगी रुग्णालयात नेले. जखमांवर मलमपट्टी करून हे सगळे पुन्हा बसस्थानकावर येईपर्यंत कर्मचारी-अधिकाऱ्यांना या प्रकाराचे गांभीर्य लक्षात आले होते. अधिकाऱ्यांनी चव्हाण कुटुंबीयांना केबिनमध्ये बसवून विचारपूस केली, उपचारांचा खर्च करण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)शुक्रवारच्या घटनेची माहिती विभागीय अभियंत्यांना देण्यात आली असून, त्यांच्याकडून बसस्थानकाच्या इमारतीची पाहणी करण्यात येत आहे. या पद्धतीच्या धोकादायक जागा शोधून तातडीने दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.- नीलम गिरी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, साताराजबाबदार कोण?या प्रकाराची जबाबदारी ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इमारतीचे बांधकाम आणि देखभालीत कोठे त्रुटी राहिल्या याचा शोध घेतला जाणार आहे. यासंदर्भात विभागीय कार्यालयाला तातडीने माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, घटनास्थळालगत असलेल्या इतर फलाटांवरील स्लॅबचा गिलावाही कोसळण्याच्या स्थितीत आहे.
सातारा स्थानकात बालके जखमी
By admin | Published: March 27, 2015 10:55 PM