रहिमतपूर : स्त्रीभ्रूणहत्येचा तोडा पाश, आम्हासही जगण्याची आहे आस, अशी व्यथा सांगत मुलींना जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थेवर भाष्य करणारी आणि दुष्काळात भरडलेल्या शेतकऱ्यांची कथा सांगणारी रांगोळी रेखाटून स्पर्धकांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. निमित्त होतं राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचं.रहिमतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. राज्यभरातील सहभागी स्पर्धकांनी विविध सामाजिक विषय रांगोळीतून मांडले. पंढरीची वारी, जय मल्हार-म्हाळसा अशा पुराणातील व्यक्तिरेखाही रांगोळीतून साकारल्या आहेत. स्पर्धकांनी समाजातील ज्वलंत प्रश्न आपल्या कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हाभरातील कलारसिक गर्दी करत आहेत. या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत व्यक्तिचित्र गटात मुंबईच्या संदीप घुले व अक्षय पै यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. तर इस्लामपूरचा सचिन अवसरे याने तृतीय, दापोलीच्या शकुनदेव महाकाल यांनी चतुर्थ तर संगमनेरच्या प्रमोद आर्वी याने पाचवा क्रमांक पटकावला. गालिचा प्रकारात कुणाल चौधरी प्रथम, पुणे, मारुती कोरे द्वितीय, रहिमतपूर, दीपक चव्हाण तृतीय, पुणे, शिवानी पवार आरफळ, चतुर्थ व पुणे येथील गणेश तुपे याने पाचवा क्रमांक मिळविला. विजेत्यांना ९५ हजार रुपयांची विविध ५५ बक्षिसे प्रदान करण्यात आली.परीक्षक म्हणून प्रा. सूर्यकांत होळकर, प्रा. प्रताप जगताप, विजय टिपुगडे, डॉ. तेजस लोखंडे, आर. बी. कदम, विजय दीक्षित, महामुनी यांनी काम पाहिले. ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश घाडगे, काकासाहेब निकम, भास्कर जाधव, सुखदेव माने, संतोष पवार, राजेश माने, शंकर भोसले, शिवाजी भोसले, प्रदीप माने, अॅड. विकास राक्षे, मारुती कोरे, निखिल काटे, अजिंक्य भोसले, रणजित माने, विक्रांत माने, अमर शेडगे, ओंकार जाधव, चेतन माने, प्रकाश माने, अमोल माने यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
बालिकेची व्यथा... दुष्काळाची कथा!
By admin | Published: October 27, 2015 10:20 PM