किडगाव : सातारा तालुक्यातील कळंबे येथे भरधाव ॲपेचालकाने पाठीमागून धडक दिल्याने दोन वर्षांची चिमुकली ठार झाली, तर एक वृध्द महिला आणि चार वर्षाचे बालक जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने चालकाला बेदम चोप देऊन ॲपेरिक्षा पेटवून दिली. हा अपघात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला.
अन्वी विकास इंदलकर (वय २, रा. कळंबे, ता. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
मदन कृष्णा इंदलकर (वय ३५, रा. कळंबे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,
सातारा तालुक्यातील कळंबे येथे भैरवानाथ देवाची यात्रा मंगळवार, दि. २ मार्च रोजी होती. मात्र, कोरोना काळात मंदिर बंद होते. त्यामुळे बाहेरूनच ग्रामस्थ दर्शन घेत होते. याच दिवशी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मदन यांच्या आई रुक्मिणी इंदलकर (वय ५८), मुलगा श्रावण मदन इंदलकर (वय चार वर्षे) आणि पुतणी अन्वी इंदलकर (वय दोन वर्षे) हे सर्वजण भैरवनाथ दर्शनासाठी आल्या होत्या. इंदलकर कुटुंंब रानात वस्ती करुन राहात असल्यामुळे ते दर्शन घेऊन वस्तीवर निघाले होते. आकले - माळेवाडी गावच्या बाजूने वस्तीकडे रुक्मिणी या आपल्या दोन्ही नातवांसमवेत कळंबे गावचे पोलीसपाटील विष्णू रामचंद्र लोहार यांच्या घरासमोर आल्या असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ॲपे रिक्षाने (एमएच ११ - बीएल ०६२३) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात रुक्मिणी, श्रावण आणि अन्वी हे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच चिमुकल्या अन्वीचा मृत्यू झाला. रुक्मिणी आणि श्रावण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. या घटनेनंतर चालक प्राण पवार हा ॲपेसह पसार झाला होता. गावातील काही तरुणांनी त्याचा दुचाकीवरून पाठलाग केला आणि गावाच्या वेशीवरच त्याला पकडले. तरुणांनी त्याला ॲपेसह गावात आणले आणि बेदम चोप दिला. यावेळी संतप्त जमावाने त्याच्या ॲपेमध्ये उसाची पाचट टाकून रिक्षा पेटवून दिली. या घटनेनंतर सातारा तालुका पोलीस तत्काळ गावात दाखल झाले. पोलिसांनी ॲपेचालक प्राण पवार याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
फोटो : ०३ अन्वी इंदलकर
फोटो : ०३ ॲक्सिडंट कळंबे
फोटो : कळंबे, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री अपघातानंतर संतप्त जमावाने ॲपेरिक्षा पेटवून दिली.