भुर्इंज : ‘डॉल्बीमुळे साताऱ्यात तिघांचे बळी गेले, खंडाळा तालुक्यातही एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे जीवावर उठलेल्या डॉल्बीला रोखणे गरजेचे झाले आहे. डॉल्बीच्या दणदणाटाने ग्रामीण भागात तर जुनी घरे ढासळतील की काय? अशी भीती वाटते, त्यामुळेच गावात डॉल्बीबंदी करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल,’ अशी माहिती चिंंधवली, ता. वाई गावच्या सरपंच माया पवार व उपसरंपच नारायण इथापे यांनी दिली.चिंधवली गावात डॉल्बीबंदी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी ग्रामसभेचा ठरावही करण्यात आला आहे. दिवसेंदिवस डॉल्बीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या भयानक स्वरुप धारण करत आहेत. विशेषत: वृद्ध, लहान मुले, रुग्ण यांना डॉल्बीचा भयानक त्रास सहन करावा लागत आहे. आनंदाच्या किंवा लग्नासारख्या शुभप्रसंगी लोकांचे वधू वरांना आशिर्वाद मिळाले पाहिजेत. आपल्या आनंदात इतरांनीही आनंदाने सहभागी झाले पाहिजे. मात्र, डॉल्बीमुळे शिव्याशाप मिळत आहेत. त्यामुळे ‘आशिर्वाद पाहिजेत की शिव्याशाप’ याचाही संबंधितांनी विचार करणे गरजेचे आहे. या विचारातूनच डॉल्बीबंदीच्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पवार व इथापे यांनी केले आहे. (वार्ताहर)विरोधकही एकवटले...ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गटतटाचे राजकारण असते. सत्ताधाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आमचा विरोध म्हणत विरोधक आडकाठी करत असतात. मात्र डॉल्बीचे दुष्परिणामच एवढे आहेत की डॉल्बीबंदीसाठी आमचा पाठिंबा म्हणत विरोधकही डॉल्बीबंदीच्या निर्णयात सहभागी होत आहेत.
डॉल्बीच्या विरोधात चिंधवलीचाही पुढाकार
By admin | Published: May 29, 2015 10:02 PM