कऱ्हाड : पोलीस असल्याची बतावणी करीत महामार्गावर परराज्यातील वाहन चालकांकडून पैसे उकळणाऱ्या तोतयास कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. महामार्ग गस्त पथकातील कर्मचाऱ्यांच्या चाणाक्षपणामुळे ही तोतयागिरी उघडकीस आली. विक्रांत विठ्ठल लाडी (वय २८, रा. काले, ता. कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्ग गस्त पथकाचे प्रमुख सर्जेराव निकम यांच्यासह सुपरवायझर अर्जुन सूर्यवंशी, राहुल रेळेकर, रूपेश भोसले हे चारजण गुरुवारी दुपारी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालीत होते. त्यावेळी मालखेड गावच्या हद्दीत सम्राट हॉटेलसमोर एक दुचाकीचालक ट्रक चालकाशी वाद घालीत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने त्याठिकाणी जाऊन चौकशी केली असता दुचाकीस्वाराने आपले नाव विक्रांत लाडी असल्याचे सांगून संबंधित ट्रकने आपल्या दुचाकीला ठोकर दिल्याची बतावणी केली. मात्र, संबंधित परप्रांतीय ट्रकचालकाने मोडक्यातोडक्या हिंदीत महामार्ग गस्त पथकाला संबंधित व्यक्ती ‘मला पोलीस असल्याचे सांगून पैसे मागत आहे,’ अशी माहिती दिली. दरम्यान, यापूर्वी दोन ते तीनवेळा विक्रांत लाडी हा महामार्गावर वाहन चालकांशी वाद घालताना गस्त पथकाला आढळून आला होता. गुरुवारी पुन्हा हाच प्रकार सुरू असल्याने व लाडी हा आपण पोलीस असल्याचे सांगून पैसे मागत असल्याची तक्रार ट्रक चालकाने केल्यामुळे गस्त पथकाने याबाबतची माहिती महामार्ग पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक सिद यांना दिली. सहायक निरीक्षक सिद हेसुद्धा कर्मचाऱ्यांसह तातडीने त्याठिकाणी आले. त्यांनी चौकशी केली असता विक्रांत लाडी हा पोलीस असल्याचे भासवून वाहन चालकांकडून पैसे उकळत असल्याचे निष्पन्न झाले. यनांद पोलिसांनी विक्रांत लाडी याला अटक केले. (प्रतिनिधी)परप्रांतीय वाहनांवर नजरविक्रांत लाडी हा पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट परिधान करून महामार्गावर थांबायचा. परप्रांतीय वाहने तो हेरायचा. संबंधित वाहने अडवून आपण पोलीस असल्याचे सांगत चालकांकडे कागदपत्रांची मागणी करायचा. लाडी अडवत असलेल्या बहुतांश वाहनचालकांना हिंदी अथवा मराठी भाषा येत नसायची. त्यामुळे ते विनातक्रार पैसे देऊन तेथून निघून जायचे, असे पोलिसांनी सांगितले.
चिरीमिरी उकळणाऱ्या तोतयाला अटक
By admin | Published: June 19, 2015 12:06 AM