सातारा : जिल्ह्यातील पोलीस प्रामाणिकपणे काम करत आहेत. चित्रा वाघ यांचे आरोप बिनबुडाचे असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे त्या बेताल वक्तव्य करत आहेत. प्रत्येक घटनेची शहानिशा करूनच त्यांनी आरोप करावेत, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्याचे गृह राज्यमंत्री देसाई यांच्याच जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याची टीका दोन दिवसांपूर्वी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली होती. यावर देसाई यांनी त्याला प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावत घटनेतील संशयितांना अटक केल्याचे सांगितले. गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले,‘‘चित्रा वाघ यांना जिल्ह्यात घडलेल्या घटनांची पुरेशी माहिती नसून त्यांनी सविस्तर माहिती घेऊन बोलावे. मागील काही दिवसात चाफळ, तांबवे, महाबळेश्वर, झिरपवाडी येथे झालेल्या घटनेतील एकूण सात जणांनादेखील अटक करण्यात आली आहे. तसेच, तांबवे येथील प्रकरणात कुटुंबीयांची भेट घेतली असून संशयितांना कडक शासन करण्यात येईल. या प्रकरणात कुटुंबीयांना तातडीची मदतही करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील एका घटनेत गट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. चाफळमधील चाकू हल्ल्यातील सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.’’
दरम्यान, चित्रा वाघ या बेजबाबदार वक्तव्य करत असून, त्यांनी वस्तुस्थितीची माहिती घेतली पाहिजे. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे त्या आरोप करत असून, त्यांनी प्रत्येक प्रकरणाची माहिती घ्यावी. राज्यभरात कुठेही महिलांवर अत्याचार झाल्यास तत्काळ कारवाई केली जात असल्याने वाघ यांनी बेताल वक्तव्य करणे सोडून द्यावे.