सातारा : साताऱ्यात गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ प्रकरणाचा तपास करताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असून, साताऱ्यातच नव्हे तर राज्यातील महिला अत्याचाराबाबत पोलीस दल संवेदनशील आहे. चित्रा वाघ यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर केलेली वक्तव्य असून आघाडी सरकारच्या कामकाजावर आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप सध्या करत आहे, असा आरोप गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली हेती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, संजय धुमाळ प्रकरणात कोणतीही दिरंगाई झालेली नाही. न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. तो जामिनावर सुटला असला तरी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी अत्यंत पारदर्शकपणे करण्यात येणार आहे. सध्या विशाखा समितीने उपशिक्षिकेचे म्हणणे रेकॉर्ड केले आहे. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याचेही म्हणणे रेकॉर्ड केले जाणार आहे. सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल या प्रत्येक दिवसात कसा तपास झाला, याची माहिती घेणार आहेत.
महिला अत्याचाराच्या घटना गतवर्षीच्या तुलनेत ४७ ने कमी झाल्या आहेत.
पहिल्या लॉकडाउनच्या काळात मी स्वतः महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात जाऊन सर्व बाबींचा आढावा घेतला होता. तसेच दुसऱ्या लॉकडाउनच्या काळात ९ जिल्ह्यात जाऊन आढावा घेतला आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्री काहीही काम करत नाहीत हा वाघ यांचा आरोप खोटा आहे.