खंडाळा : उष्णतेचा उच्चांक आणि पाणीटंचाई यामुळे उन्हाळा नेहमीच त्रासाचा ठरत असतो. वाढत्या उन्हाचा चटका माणसाप्रमाणे पक्ष्यांना बसत असतो. सध्याच्या उन्हाळ्यात मानवाप्रमाणे त्याचेही स्वर कोरडे पडू नयेत, यासाठी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नायगाव येथील सूर्यरत्न फाउण्डेशनच्या निसर्गप्रेमी सदस्यांनी पक्ष्यांसाठी दाणापाणी पात्र वाटप करून शेकडो पक्ष्यांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न केला.
झाडांमध्ये घरटे करून राहणाऱ्या पक्ष्यांचा मधुर आवाज ही पक्ष्यांची खरी ओळख, त्याच्या मधुर आवाजाला आपली नजर नेहमी शोधत असते. पण, रखरखत्या उन्हाने त्यांचा जीव कासावीस होत असतो, परिणामी पक्ष्यांचे जीवन धोक्यात येऊ लागले आहे. उन्हामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन बरेच पक्षी उडताना खाली पडल्याचे पाहायला मिळते. काही उष्माघाताने दगावल्याचे दिसून येते. माणूस त्याच्या गरजा अत्याधुनिक सोयीसुविधांनी तत्काळ पूर्ण करू शकतो; पण या पक्ष्यांचे काय? पक्ष्यांना नैसर्गिक स्रोतांतून गरज पूर्ण करावी लागते. त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होतात. काही पक्षी अंघोळ करून तर काही पक्षी पाणी पिऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगाव येथील सूर्यरत्न यूथ फाउण्डेशन यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त गावातील व पंचक्रोशीतील १०० पक्षीप्रेमींना मोफत दाणापाणी पात्र वाटप करण्यात आले.
सह्याद्रीच्या प्रत्येक पशुपक्ष्यांत महाराष्ट्राचा जीव आहे आणि तो टिकवण्यासाठी या सर्व युवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर यावेळी सरकारने घातलेल्या कोरोना ताळेबंदीबद्दल व लसीकरणाबद्दल जनजागृती केली. तसेच संस्थेने दाणापाणी पात्र बनविण्यासाठी टाकाऊ तेलाच्या मोकळ्या डब्यांचा वापर करून निसर्गपूरक संदेश सर्वांना दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हितेश नेवसे, किरण पवार, संदेश भुजबळ, सागर नेवसे, प्रवीण पवार, सिद्धेश नेवसे, भारती सातव, स्वप्नील नेवसे, सुजय नेवसे उपस्थित होते.
(कोट..)
टाकाऊपासून टिकाऊ व पक्ष्यांना दाणापाणी असा दुहेरी उद्देश असणारा सूर्यरत्न यूथ फाउण्डेशनचा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांनी नवीन पिढीमध्ये वन्यजीवांबद्दल प्रेम निर्माण होईल व त्यांना पक्षी निरीक्षणाची संधी स्वतःच्या परिसरात उपलब्ध होईल.
-डॉ. सुजीत नेवसे, सहायक वनसंरक्षक
..............................
०५खंडाळा०५
नायगाव येथील सूर्यरत्न फाउण्डेशनच्या निसर्गप्रेमी सदस्यांनी पक्ष्यांसाठी दाणापाणी पात्र वाटप करून शेकडो पक्ष्यांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न केला.