चाफळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील शासकीय इमारतीचे अज्ञाताने कुलूप तोडले आहे. तर एक कुटुंब गेली अनेक महिन्यांपासून येथे वास्तव्य करत आहे. असे असतानाही प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. येथे कोणीही या व बंद इमारतीचे कुलूप तोडून राहा, अशी परिस्थिती ओढावली आहे.
शासकीय इमारतीची धर्मशाळा होऊ पाहत असतानाही जिल्हा प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी याची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.राजकीय व धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असे चाफळ गाव आहे. विभागातील जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने चाफळ येथे शिंंगणवाडी रस्त्याकडेला शासनाने १९९२ च्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र्रासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधली आहेत.
जमीन हस्तांतरानंतर येथे शासनाने कंपाऊंडही घातले आहे. असे असताना या दवाखान्यास जागा देऊ केलेल्या मूळ मालकाच्या नातेवाइकाने ही जागा आपलीच असल्याचा दावा करत चक्क शासकीय इमारतीवर ताबा मिळवला आहे.
याबाबत लोकमतने आवाज उठवत सांगा पाहू ही इमारत नक्की कोणाची? या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध करताच येथील आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. इमारत नोंदीबाबतची कागदपत्रांची जमवाजमव करू लागले. या गोष्टीला तब्बल एक महिन्याचा कालावधी लोटला असतानाही ठोस कारवाई केली जात नाही, हे विशेष.