प्रगती जाधव-पाटील
सातारा : साहित्य खरेदी असो की अंतरावर असणाऱ्या शेजाऱ्यांकडे जाणे असो, गाडी काढली की भुर्रर्र ही पध्दत सर्रास पाहायला मिळते. परिणामी रस्त्याच्या चढ-उतारांनी चालणे, खड्डा चुकवून पुढे पाय टाकणे याची सवयच आता मोडली आहे. परिणामी कधी चालायची वेळ आलीच तर रस्त्यावर चालण्याचा अंदाज नसल्याने ठेचकळत चालावे लागतेय, त्यामुळे गुडघ्याला दुखापत सहन करावी लागत आहे.
सातारा शहर छोटे असले तरीही उपनगरांमध्ये याचा विस्तार वाढू लागला आहे. शहराच्या गर्दीत राहण्यापेक्षा उपनगरांत स्वयंभूपणे राहण्याची मानसिकता वाढली. राहायला घर मिळाले तरी मूलभूत गरजांसाठी शहरात यावे लागत असल्याने घरात अतिरिक्त गाडीची गरज भासली. ही गाडी ताब्यात मिळाल्यानंतर पायी चालण्याचे प्रमाण कमी कमी आणि अलिकडे तर नाहीसे व्हायला लागले. रस्त्याने चालणारे कोणीतरी येतंय म्हणून किंवा रिक्षा मिळत नाही म्हणून चालत असल्याचे पाहायला मिळते.
चालण्याचा सराव संपुष्टात आल्याने चढाने किती ताकद वापरावी आणि उताराने किती ऊर्जा वाचवावी, याची गोळाबेरीज करण्याचा सराव चिमुकल्यांना नाही. त्यामुळे ते चढण, उतरण आणि सपाटीवर एकाच पध्दतीने चालतात. त्यामुळे थोडे चालले तरी त्यांना दम लागतो आणि घरातले मोठे त्यांची काळजी म्हणून आपण पुन्हा गाडीवर जाऊ असे सुचवतात. महिन्यातून एकदा गाडी बंद आणि आठवड्याची मंडई चालत आणणे ही शिस्त अवलंबणे आवश्यक आहे.
चौकट :
का मोडली सवय
हल्ली प्रत्येक घरात एक दुचाकी आणि चारचाकी आहे. मंडईत जाणे असो की किराणा आणणं असो, छोटी गाडी काढली की झालं ही कुटुंबाची मानसिकता झाली आहे. पायी भाजी आणायला जाणाऱ्यांची संख्याही कमी आहे. पालिकेने उभ्या केलेल्या मंडईच्या पार्किंगवरून याचा अंदाज सहज लावता येतो. अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर राहणारे तर पिशवी खाली सोडून त्यात साहित्य भरून ती वर खेचतात. शारीरिक कष्ट करण्याचा आळस हे सवय मोडण्यासाठी कारणीभूत आहे.
काय आहेत उपाय
एक किलोमीटर परिसरात असलेल्या कामासाठी गाडीचा वापर टाळा
एकटे बाहेर पडण्यापेक्षा सोबतीने जावा
छोट्या-छोट्या अंतरावरील कामे पायी जाऊन करा
साहित्य खरेदी करताना एकदम ओझे आणण्यापेक्षा टप्प्या-टप्प्याने आणा
चालणे हे सवयीचे करून घ्या
यासाठी तरी मुलांना पायी चालवा!
रस्त्याने चालत जाताना शारीरिक हालचाल होते. त्याबरोबरच चालत फिरण्याने परिसराची ओळख, महत्त्वपूर्ण खुणा लक्षात राहतात. दुसरं म्हणजे ज्या भागात आपण राहतो तो परिसर, त्यातील गल्ली-बोळ माहीत असतील, तर एखाद्या बाका प्रसंगाला सामोरे जाताना फार अडचण होत नाही. कित्येकदा गल्लीशेजारी असणारी महत्त्वाची दुकाने, ठिकाणे याची माहिती नसल्याने मुलांना एकटे फिरताना आपले घर शोधणेही अवघड जाते. पायी फिरताना मुलांना ठळक खुणा आणि परिसराची माहिती होते.
या कारणांनीच होतेय चालणे
ज्येष्ठ : व्यायाम म्हणून सकाळ-संध्याकाळ
महिला : किराणा किंवा रिक्षा मिळेपर्यंत
पुरूष : गाडी लाऊन घरापर्यंत किंवा शतपावली
तरुणाई : गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरी
बालके : खेळून घरी परतताना
कोण किती चालतं
ज्येष्ठ : ३५
महिला : २७
पुरुष : १७
तरुणाई : १३
बालके : ८
कोट :
पायाच्या स्नायूंचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. नियमित उठ-बस करणे एवढ्यापुरतेच ही क्रिया मर्यादित राहतेय. दिवसभरातून किमान १५ मिनिटे सलग चालण्याचा व्यायाम असणे आवश्यक आहे. यामुळे गुडघ्यांचे दुखणे बळावत नाही. चालण्याचा सराव नसल्याने ठेच लागून पडण्यानेही गुडघ्याला दुखापत होते.
- डॉ. प्रमोद जगताप, अस्थिरोगतज्ज्ञ, सातारा