वाई : ग्रामपंचायत निवडणुकीचा फिव्हर जोरात असून गाव करभारी होण्यासाठी रिंगणात उतरलेले कंबर कसून कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी प्रत्येक गावात आपली सत्ता कशी येईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत.
वाई तालुक्यात बावधन, ओझर्डे, शेंदूरजणे, पसरणी, मेणवली, केंजळ, गुळूंब, चांदक, वेळे, खानापूर, शिरगाव, भोगाव, चिखली, अभेपुरी, पांडेवाडी, वारखडवाडी, व्याजवाडी या गावांमध्ये अटीतटीची लढत आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीवर शासकीय यंत्रणेची व पोलीस खात्त्याची जाचक अशी वाटणारी करडी नजर असल्याने कार्यकर्त्यांना काहीशी अडचण झालेली आहे. वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार गीतांजली गरड यांनी वाई तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या पार्किंगमध्ये १५० मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशीचा कामकाज पाहणी करणाऱ्या अंदाजे ५०० अधिकारी व कर्मचारी यांना राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानाच्या दिवशी येणाऱ्या अडचणी विषयांच्या मार्गदर्शनासाठी एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले होते. यामध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी योग्य मार्गदर्शन करून वाई तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी प्रांत व तहसील कार्यालय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती दिली आहे.
वाई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन स्थानिक गावपुढारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन गावकी व भावकी व घराघरातील नातेसंबंधामध्ये कटुता येऊ नये व गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये व वाद टाळण्यासाठी तब्बल १९ ग्रामपंचायती बिनविरोध केल्या. हा नवीन आदर्श या १९ गावातील लोकांनी घालून दिला आहे. वास्तविक पाहता यानुसार इतर गावांनी आदर्श घेणे गरजेचे असतानादेखील ५७ ग्रामपंचायतींमध्ये आज वैयक्तिक हेव्यादाव्यातून निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. या ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी १५० मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहेत व या केंद्रांवर एकूण १५० मतदान मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. उपलब्ध मशीनमध्ये मतदान केंद्रावर अचानक बिघाड झाल्यास त्याऐवजी दुसऱ्या मशीन तातडीने पुरविण्यासाठी ५० राखीव मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली आहेत. १५० केंद्रांवर प्रत्येक ठिकाणी एक केंद्रप्रमुख, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई. १ पोलीस अशा जाणाऱ्या टीम १५ राखीव टीम ठेवण्यात आलेल्या आहेत.
वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व भुईंज स.पो.नि. आशीष कांबळे या दोघांनी संवेदनशील गावांत मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. प्रसंगी एस. आर. पी. ग्रुपची तुकडी ही मागवण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक कोणत्याही गावात हुल्लडबाजी झाल्यास कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. तरी ५७ गावात होत असलेल्या या निवडणूक मतदान प्रक्रियेत शांतता राखून मतदान करण्याच्या सूचना प्रांताधिकारी व तहसीलदार व पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत.