सातारा : वेण्णा नदीपात्रात म्हैस धुवत असताना तरुणाच्या गळ्याला ब्लेड लावून चोरट्याने लुटले. मात्र, प्रसंगावधान राखून संबंधित तरुणाने नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडून बेदम चोप दिला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २७) घडली. जखमी चोरट्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल बाळू काळे (वय २५, रा. काेयना सोसायटी, लक्ष्मी टेकडी कॅनाॅलजवळ खेड, ता. सातारा) हा तरुण मंगळवारी दुपारी वाढे फाट्यावरील वेण्णा नदीमध्ये म्हैस धुवत होता. त्यावेळी संतोष भरत यादव (वय २२, रा. रहिमतपूर, ता. काेरेगाव, जि. सातारा) हा पाठीमागून आला. त्याने विशालच्या गळ्याला ब्लेड लावले. त्यानंतर त्याच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतली. या झटापटीत विशालच्या गळ्याला चेन काचून व चोरट्याच्या हातातील ब्लेड लागून तो जखमी झाला. अशा अवस्थेतही त्याने प्रसंगावधान राखून संशयित चोरटा संतोष यादवला पकडून ठेवले. त्याने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. त्यानंतर त्या लोकांनी संशयित चोरटा संतोष यादवची यथेच्छ धुलाई केली. या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चोरटा संतोष आणि फिर्यादी विशाल याला पोलिसांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.सातारा तालुका पोलिस ठाण्यात संतोष यादववर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो एका चायनीज गाड्यावर काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे अधिक तपास करीत आहेत.
आधी गळ्याला ब्लेड लावून लुटले; नंतर नागरिकांनी 'त्याला' चोपले!, साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: June 28, 2023 3:44 PM