आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २0 : शहरी भागात वीजवितरणाकडून नुकतेच बिलाचे वाटप झाले. या बिलांमध्ये बहुतांशी ग्राहकांना आलेल्या बिलावरील रकमेची बेरीज केली असता अधिक असल्याने काही ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता बिलांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक असल्याने एकूण रकमेची ताळमेळ बसत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, या बिलांमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क, वीज विक्रीकर अशा विविध आकारणी घेऊन ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या युनीटनुसार बिल दिले जाते. या सर्वांची बेरीज करून येणारे बिल ग्राहक भरतात; परंतु नुकत्याच देण्यात आलेल्या बिलामध्ये यातील काही शुल्क व्यवस्थित प्रिंटिंग न झाल्याने ही रक्कम बिलावर न उमटल्याने अर्धवट प्रिंटिंग झालेले बिल ग्राहकांच्या हाती पडल्याने ग्राहकांना वाटले की महामंडळाची बेरीज करताना चूक झाली असून, या बिलाची दुरुस्ती करण्यासाठी ग्राहकांना महामंडळाच्या कार्यालयात जाऊन शहानिशा करावी लागली.सदर बझार येथील अनेक ग्राहकांना मिळालेल्या बिलामध्ये एकूण रकमेत फरक येत असल्याने येथील नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन बिल जास्त आल्याची तक्रार केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेत या बिलाची संगणकप्रणालीत पाहणी केली. यामध्ये बिलावर काही अक्षरे व रक्कम न छापली गेल्याने फरक झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे देण्यात आलेले बिल हे बरोबर असून, केवळ प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे त्यांनी खुलासा केला. यासाठी महावितरणाने योग्य ती खबरदारी घेऊन ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
बिलांविषयी ग्राहकांच्या अनेक तक्रारी...
वीजबिलांविषयी ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. बिले वेळेवर मिळत नाही, प्रमाणापेक्षा अधिक बिल येतात; परंतु आज बिलाच्या रकमेतील फरकाची पहिल्यांदाच तक्रारी पाहायला मिळाल्या, तेही केवळ महावितरणाच्या छपाईच्या सदोषामुळे.