शेखर जाधववडूज: ‘प्रेम द्यावे भरभरून, मात्र नेहमीच आमची फाटकी झोळी’ अशी काहीशी अवस्था खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे. त्याला कारण ही तसे आहे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले तहसीलदार किरण जमदाडे यांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच बदलीचे वारे तालुक्यातील काेनाकोपऱ्यात पोहोचले. सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींमधूनही आवाज निघू लागला की, ‘रावसाहेब काहो चाललात, जरा थांबाना.’वडूज शहरातील तहसील कार्यालय हे जनतेला आणि कित्येक वर्षे कागदोपत्री अडकलेल्यांना न्याय मिळेल, असे देवालय वाटते. जरी काही तांत्रिक कारणांमुळे काम झाले नाही तरी शाब्दिक सल्ल्याने समाधान नक्कीच मिळते, ही प्रचिती सर्वस्तरातील लोकांना आली आहे. हवेहवेसे वाटणारे तहसीलदार किरण जमदाडे यांची बदली हा शब्द कानावर पडताच चुकीचं घडतंय ही भावनाही व्यक्त केल्या जात आहेत.महसुली कामांची चुणूक, आंदोलने-मोर्चाला सामोरे जाण्याची हातोटी, समन्वय साधण्याचे अप्रतिम कसब, गोरगरीब जनतेसाठी चाेवीस तास एकच ध्यास घेऊन कार्यरत राहणारे जमदाडेसाहेब यांचा कार्यकाल पूर्ण होऊन एक वर्षे जादा कार्यकाल द्यावा, यासाठी जनता आग्रही असल्याचे वास्तव समोर येत आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील महसुली कामकाजात अव्वलस्थानी असलेला खटाव तालुका यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे तहसीलदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वीदेखील महसुली विभागात कार्यरत असणारे अनेकांना तालुक्यातील जनता किती संयमी व आदर करणारी आहे. याची अनुभूती देणारे अनेक सेवानिवृत्त अधिकारी या भूमीबद्दल गौरवोद्गार करताना आढळतात.
भाऊबंदकीचे वाद चुटकीसरशी बाजूला
तीन-तीन पिढ्या बांधावरील रस्त्यासाठी भाऊबंदकीचे अनेक वाद चुटकीसरशी सोडवून जनमाणसात जमदाडे यांनी अढळस्थान निर्माण केले. मात्र, शासनाच्या अततायीपणामुळे दुष्काळी भागातील लोकांशी जोडलेल्या नाळेची होत असलेली तूट सर्वसामान्य माणसाला पचनी पडत नाही हे त्रिवार सत्य आहे. संबंधित प्रशासनाने तालुक्यातील जनतेची आर्त आळवणी आणि महसुली कामाचा लेखाजोखा तपासूनच निर्णय घ्यावा, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.