अंगापूर : नादगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अंगापूर वंदन येथे लसीकरण करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. कमी प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने वादावादीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम राबविताना स्थानिक ग्रामप्रशासनाची दमछाक होत आहे. तसेच ‘लस देता का लस’ अशी याचना आरोग्य विभागाकडे करावी लागत आहे.
आरोग्य विभागाकडून उपलब्ध लसीची माहिती स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला आदल्यादिवशी संध्याकाळी दिली जाते. त्यावर ग्रामपंचायत प्रशासन समाजमाध्यमातून ही माहिती गावच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असते. त्या माहितीच्या आधारे स्थानिक नागरिक पहाटेपासूनच न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात रांगा लावून एकच झुंबड उडत आहे. मात्र लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस पूर्ण होणाऱ्यांची संख्या सहाशेच्या वर, तर उपलब्ध लस शंभर अशी परिस्थिती आढळून येत आहे.
आरोग्य विभागाकडून नेहमीच लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नक्की लस द्यायची कोणाला? असा प्रश्न पडत आहे. त्यावर ग्रामप्रशासन योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करीत असते. तरीसुद्धा ग्रामप्रशासन व नागरिकांत लसीकरणासाठी अनेक वादावादीचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे ही मोहीम राबवितांना ग्रामप्रशासनाची दमछाक होत आहे. पात्र लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, तेवढी लस उपलब्ध होत नाही. यांची माहिती आरोग्यविभागाकडे दिली असतानाही आरोग्य विभाग याची दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे लस देता का लस असा टाहो ग्रामप्रशासन आरोग्य विभागाच्या आधिकाऱ्यांकडे फोडत असल्याचे चित्र आहे.
चौकटःः
पहिला डोस घेतलेले पात्र नागरिक
५ एप्रिल १९०
१२ एप्रिल २४६
१९ एप्रिल १६०
एकूण.. ५९६
उपलब्ध लस ११०
शिल्लक ४८६
फोटो...सातारा लोकमतला मेल...
फोटो ओळ
नादगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अंगापूर वंदन येथे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. (छाया : संदीप कणसे)