पळशी : माण तालुक्यातील मार्डी येथे रेशनिंगचे धान्य देताना योग्य नियोजन नसल्याने नागरिक गर्दी करत आहेत. गेल्या महिनाभरापासून मार्डी परिसरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून, ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे. एकीकडे मार्डी गाव काटेकोरपणे नियम पाळत आहे. मात्र, रेशनिंग दुकानावर धान्य घेण्यासाठी लाभार्थी तोबा गर्दी करत असून, वाढणाऱ्या गर्दीवर कोणाचाही अंकुश नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
स्वस्त धान्य नेण्यासाठी लाभार्थी दुकानावर एकच गर्दी करत स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. गर्दी कमी करण्यासाठी व सुरक्षेसाठी पुरवठा विभागाने योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. मार्डी गाव व परिसरात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने मार्डी गाव ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. भीतीने कोणीही घराबाहेर येण्यास धजावत नाही. आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन समिती, प्रशासन रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मार्डी परिसरात मोलमजुरीची कामेही बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत असून, रेशनिंगवरच अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. प्रशासनाने रेशनिंग दुकानाला मुभा दिली असल्याने नागरिक दुकानात गर्दी करत आहेत. मार्डीत दुकानदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला असून, कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. तर बऱ्याचदा लाभार्थ्यांना नंबर लावूनही दोन-दोन दिवस धान्य मिळत नसल्याने भरउन्हात त्यांना दुकानाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. दुकानदाराने योग्य उपाययोजना करत घरपोच धान्य सुविधा द्यावी, अशी मागणी होत आहे.
(चौकट)
सोशल डिस्टन्सिंगचा अभाव...
मार्डीत रेशनिंगचे वितरण करताना नियमांची पायमल्ली होत असून, मोठ्या प्रमाणात गर्दी करत सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने संबंधित दुकानदारावर दहिवडी पोलीस स्थानकामध्ये १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा विभागाने योग्य नियोजन करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करावी.
(कोट)
दुकानात नंबरप्रमाणेच धान्य दिले जाते. वारंवार सुरक्षेबाबत सूचना देऊनही लाभार्थी कानाडोळा करत गर्दी करतात. स्थानिक कमिटीने गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे.
- विजय जाधव, रेशन दुकानदार, मार्डी
२९ पळशी
मार्डी (ता. माण) हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, येथे धान्य वितरणावेळी रेशन दुकानात लाभार्थी मोठी गर्दी करत आहेत. (छाया : शरद देवकुळे)