लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील स्थानिक प्रशासनाने १ ते ९ मे पर्यंत सलग नऊ दिवस जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खटाव तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या मायणी गावामध्ये व मायणी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मायणी ग्रामपंचायत, कोरोना कमिटी, पोलीस पाटील, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १ मे ते रविवार, दि. ९ मे पर्यंत सलग नऊ दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
यामुळे येथील चांदणी चौक परिसर, बसस्थानक परिसर, चावडी चौक, उभीपेठ आदी परिसरात असलेली बाजारपेठ, शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था, तसेच स्थानिक वाहतूक या जनता कर्फ्यूमुळे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकही घरीच राहणे पसंत करीत आहेत व स्थानिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे बाजारपेठेसह मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण या दोन्ही राज्य मार्गावर शुकशुकाट पसरला होता.
०२मायणी
जनता कर्फ्यूमुळे येथील मुख्य चांदणी चौक परिसरात असा शुकशुकाट पसरला आहे. (छाया : संदीप कुंभार)