वाई : ‘कोरोनाचा कहर वाढला असून, सुरुवातीला शहरी भागात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. काही गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. वाई पश्चिम भागात जांभळी, बोरगाव या गावासह इतर गावातही रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे,’ असे मत जांभळी येथे भेट प्रसंगी तहसीलदार रणजित भोसले यांनी व्यक्त केले.
कोरोना ग्रामीण भागात हातपाय पसरत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची कमी जाणवत असून, उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होताना दिसत आहे. त्यामुळे या महासंकटात नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
वाईच्या पश्चिम भागातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जांभळी गावातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. संदीप यादव, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शेठ सणस, मंडल अधिकारी उपस्थित होते. त्यांनी गावाचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत व ग्रामसुरक्षा कमिटी सदस्य व ग्रामस्थांना मार्गदर्शन करून उपाययोजना सुचविल्या. यावेळी परिस्थितीचा आढावा घेत असताना ज्ञानदेवशेठ सणस यांनी खावली उपकेंद्रात बेड सुविधा उपलब्ध करून निवासी डॉक्टर मिळावेत. या भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून ग्रामीण भागात लसीकरण मोहीम गतिमान करावी, अशी मागणी केली. यावेळी भिकू सणस, जांभळीच्या सरपंच निशा चिकणे व उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.