खटाव : गतवर्षीच्या तुलनेत यावेळी कोरोनाचे सुरू असलेले हे तांडव सर्वांनाच भयभीत करत आहे. परंतु अजूनही काही महाभाग या गोष्टीला लाईटली घेऊन मला काय होतंय, म्हणून रस्त्यावर विनाकारण मोकाट व बिनधास्त फिरत आहेत. त्यांच्यावर कुटुंबातील सदस्यांनी बंधन घालण्याची गरज आहे. अन्यथा कठोर करवाई करण्याची वेळ आता आली आहे.
कोरोनाची सध्याची परिस्थिती ही आणीबाणीची परिस्थिती असून, झपाट्याने वाढणारा कोरोना थांबवणे प्रत्येकाच्या हातात आहे. परंतु तरुणाईकडून बेफिकीरपणे सुरू असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना पोलीस प्रशासनावरही अधिक ताण येत आहे. आपल्या सुरक्षेसाठी ते जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. सध्या कोरोना सेंटर फुल्ल आहेत. त्यामुळे होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या सर्वच गावात अधिक आहे. परंतु याच होम क्वारंटाईन नागरिकांकडून कोरोनाचा प्रसार होत आहे. होम क्वारंटाईन लोकच सध्या कोरोनाचे सुपर स्प्रेडर (वाहक) बनताना दिसून येत आहेत.
याकरिता स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, सामाजिक कार्यकर्ते, दक्षता कमिटी सदस्य तसेच गावातील असणाऱ्या विविध मंडळांनी एकत्र येऊन गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेऊन प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याची वेळ आली आहे.
चौकट..
क्वारंटाईनचे शिक्के मारणे गरजेचे..
गावात अनेक रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने ग्रस्त असूनही औषध विक्रेत्यांकडे जाऊन त्यावर औषध घेऊन घरीच उपचार घेऊन गावभर फिरत आहेत. त्यामुळेच कोरोना वाढत आहे.
याकरिता होम क्वारंटाईन असणाऱ्या तसेच हायरिस्कमधील व्यक्तींच्या हातावर मागील वर्षाप्रमाणे होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्याची गरज आहे. त्यामुळे बाधित व्यक्तीपासून इतर आपोआपच बाजूला होऊ शकतील. कोरोनाची साखळी तुटण्यासही मदत होईल, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांतून सर्वत्र जोर धरू लागली आहे.
२३खटाव
कॅप्शन : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.