विनाकारण फिरणारासह क्रिकेट खेळणारांना पोलिसी खाक्या;
पालिकेसह पोलीस आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शहरात संचारबंदी लागू असतानाही रस्त्यांवर नागरिकांचा राबता होता. शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत अनेक युवक विविध कारणे सांगत विनामास्क फिरत होते, तर मंगळवारी सायंकाळी काही ठिकाणी गल्लीबोळांसह पटांगणात क्रिकेटचे डाव पडले होते. अशा युवकांना पोलीस कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांच्या या कारवाईनंतर शहरातील फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शासनाकडून अनेक धाडसी निर्णय घेतले जात आहेत. याचा फैलाव रोखण्यासाठी राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या सर्व निर्णयांची मलकापुरातही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांसह पालिकेने कंबर कसली आहे. संपूर्ण राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. मात्र, साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीही लागू केली आहे. असे असतानाही शहरातील शिवछावा चौक, आगाशिवनगर, शिवाजी चौक व मंडई परिसरात काही प्रमाणात नागरिकांचा राबता होता, तर अनेक युवक सायकलवरून व चालत विनाकारण फिरत होते. शिवछावा चौकात येणाऱ्या प्रत्येकास थांबवून विचारपूस करण्यात येत होती. संबंधित युवक रस्त्यावर फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी सबळ कारण न सांगितल्यास पोलिसी खाक्याचा प्रसाद मिळत होता. अशा पद्धतीने पोलिसांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील शिवछावा चौक व आगाशिवनगर परिसरात कारवाई केल्यानंतर रस्त्यावरील गर्दी कमी दिसत होती, तर स्वतःच्याच काळजीसाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन पालिका व पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येत होते.
चौकट
पालिकेचे कर्मचारी १४ तास ऑनड्यूटी..
येथील पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनामुक्त मलकापूरसाठी कंबर कसली आहे. या सहा दिवसांतील लॉकडाऊन कडक पद्धतीने राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. ९ तपासणी नाक्यांसह शहरात गस्तीसाठी सकाळी ६ ते रात्री ८ अशी चौदा तास ऑनड्यूटी थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
चौकट
पोलीस २४ तास रस्त्यांवर..
शहरात शासनाचे सर्व आदेश काटेकोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे शिवछावा चौकासह शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट लावले आहेत, तर काही पोलीस कर्मचारी दुचाकीवरून तर वेळोवेळी प्रमुख अधिकारीही शहरात फिरून २४ तास गस्त घालत आहेत.
२६मलकापूर
मलकापुरात शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत अनेक परप्रांतीय युवक विविध कारणे सांगत विनामास्क फिरत होते. (छाया माणिक डोंगरे)