कऱ्हाड : विद्यानगर येथील महाविद्यालयाच्या परिसरात तसेच कृष्णानाका येथे दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडून कर्णकर्कश हॉर्न वाजविले जात आहेत. याचा नागरिकांना त्रास होत आहे. ठिकठिकाणी शांतता क्षेत्र असूनही त्याचे उल्लंघन करीत हॉर्न वाजविले जात आहेत. वाहतूक पोलिसांनी संबंधित चालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
उद्यानाजवळ कचरा
कऱ्हाड : येथील कृष्णाघाट परिसरातील उद्यानाजवळ रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा उघड्यावर पडला आहे. कचऱ्यामुळे त्या परिसरात दुर्गंधीही येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रीतिसंगम बाग बंद आहे. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
वाहतूक अस्ताव्यस्त
कऱ्हाड : येथील कृष्णा कॅनॉल परिसरातून मसूर व विट्याच्या दिशेने वाहने जातात. मात्र, या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी आयलँड उभारण्याची गरज आहे.
धोकादायक वितरण
कऱ्हाड : विद्यानगर परिसरात गॅस सिलिंडरचे वितरण करताना सिलिंडर रस्त्यावर टाकले जात आहेत. वितरण करणारे कर्मचारी वाहनातूनच टाकी खाली टाकून देत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे काम करावे, अशी मागणी होत आहे.