रामापूर : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. राज्यातील अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचे व्यवसाय बंद पडले. यामुळे अनेकांसमोर मोठे संकट उभे राहिले. काहींनी या आलेल्या कोरोनाच्या संकटाला संधी मानत लोकांना घरपोच भाजीपाला आणि तोही विषमुक्त असा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याला पाटणमधील शहरवासीय नक्कीच साथ देतील, असे प्रतिपादन सामाजिक महिला कार्यकर्त्या विद्या नारकर यांनी केले.
पाटण येथील दादासाहेब पाटणकरनगर येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘मंडई आपल्या दारी’ या फ्रेश फार्मच्या उद्घाटन समारंभप्रसंगी त्याबोलत होत्या. यावेळी पाटण जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री बोडके, पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजय कवडे, पाटण नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, पाटण नगरपंचायतीच्या नगरसेविका संगीता चव्हाण, रश्मी राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे, राजेंद्र चव्हाण आणि शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विद्या नारकर म्हणाल्या, पाटण शहरातील नोकरी करणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यांना नोकरी करून घरी आल्यानंतर, आज भाजी कोणती करायची, हा प्रश्न नेहमी पडतो. तो आता या फ्रेश फार्ममुळे पडणार नाही. आता महिलांनी फोन केला की, त्यांना ताजी आणि तीही विषमुक्त अशी भाजी घरपोच मिळणार आहे. कोरोनाच्या काळात आलेल्या संकटाला संधी समजून शहरातील विकास शिर्के, अंकिता पवार आणि सुनीता केळके यांनी सुरू केलेल्या या नवीन उपक्रमाला पाटण शहरवासीय नक्कीच साथ देतील.
आनंदा पवार यांनी स्वागत केले, तर विकास शिर्के यांनी आभार मानले.