कराड - दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. कृष्णा, कोयना या नद्यांना पूर आल्याने कराड, पाटण परिसरात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून एनडीआरएफची टीम मागविण्यात आली आहे.
पाटण व कराड तालुक्यातील पुरस्थितीत लोकांच्या सुरक्षेच्या कारणासाठी आज पुण्यावरुन एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल होणार आहे. या टीमला प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन पुरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.
एनडीआरएफ टीमकडे 2 बोटी व प्रशासनाकडे 2 बोटी असे एकूण 4 बोटी असून या बोटी कराड व पाटण तालुक्यातील लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहेत. या एनडीआरएफच्या टीममध्ये 22 ते 24 जवान असणार असून या टीमला प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार ही टीम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी काम करणार आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. कराडलाही तुफान पाऊस सुरू आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणने नवीन कृष्णा पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या सुचना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे कराड- विटा रोडवरील नवीन कृष्णा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन कराड तालुका प्रशासनाने केले आहे. (छायाचित्रे सौजन्य - उदय जाधव)