लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरामध्ये तसे पाहिले तर दिवसाही गस्त असते. परंतु दर तासाला रात्रीची गस्त पोलिसांची सुरू असते. ही गस्त घालण्यासाठी पोलिसांना १५ वाहने देण्यात आली आहेत.
शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाणे ही तिन्ही पोलीस ठाणी स्वतंत्र आहेत. या तिन्हीही पोलीस ठाण्यांना गस्त घालण्यासाठी वाहने देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे रात्री अकरानंतर गस्त घालण्यास सुरुवात होते. शहरातील संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोगदा परिसरात दर अर्ध्या तासाला पोलीस गस्त घालत असतात. अलीकडेच या भागामध्ये एका पाठोपाठ दाेन खून झाल्याने हा भाग आणखीनच संवेदनशील बनला आहे. मध्यरात्री अंधाराच्या आडोशाला गैरप्रकार करणाऱ्या टोळक्यांवर यामुळे अंकुश आला आहे. त्याचबरोबर बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरातही लुटमारीचे प्रकार अधून मधून घडत असतात. त्यामुळे या परिसरातही गस्त सुरू असते. पोलीस वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे गस्तीचे ठिकाण, वेळ समजून येते. त्यामुळे पोलिसांकडून गस्त ही काटेकोरपणे घातली जात असल्याचे पहायला मिळाले.
शहरात गेल्या वर्षभरात झालेल्या चोऱ्या, घरफोड्या
शहर व परिसरात गत वर्षभरात २६८ चोऱ्या व घरफोड्या झाल्या. यातील ४३ चोऱ्या पोलिसांनी उघडकीस आणल्या. शहरात मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर चोऱ्या, घरफोड्या कमी झाल्या. तब्बल सहा महिने कुठेही चोरी होत नव्हती. परंतु लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा चोऱ्या वाढू लागल्या. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखीनच वाढली गेली. यादीवरील चोरटे पसार असल्यामुळे पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड बनत आहे.
‘लोकमत’चा वाॅच
पोलिसांनी गस्त वाढवली तर घरफोड्या, चोऱ्या निम्म्याहून कमी येतील. यासाठी नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याचा लोकमतने आढावा घेतला. शहरातील काही अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी अलीकडे गस्त वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु काही ठिकाणी पोलीस पोहोचत नसून, केवळ वाहनातून लगेच निघून जातात, असेही त्यांनी सांगितले. मोळाचा ओढा परिसरात पोलीस क्वचितच फिरकत असल्याचे एका नागरिकाने सांगितले.
या वाहनांवर नियंत्रण कसे ठेवले जाते?
पोलीस ठाण्यातून गस्तीची वाहने बाहेर पडल्यानंतर जीपीएसद्वारे त्याची माहिती नियंत्रण कक्षाला समजत असते. कुठेही अनुचित प्रकार घडला. तर पोलीस तत्काळ संबंधित कर्मचाऱ्याला मेसेज पोहोचवितात. जीपीएसमुळे पोलिसांच्या गस्ती वाहनांवर नियंत्रण ठेवण्यास खूपच मदत झाली आहे.
गस्त आणखी वाढणार
सातारा तालुका परिसरातील हद्द आणि शहराच्या काही भागामध्ये गस्त वाढविणार आहे. पोलीस चांगल्याप्रकारे गस्त घालत असून, रात्री अपरात्री कोणत्याही अनुचित घटना घडत नाहीत.
सजन हंकारे, पोलीस निरीक्षक