सातारा शहरातील ओढ्यांमध्ये कचरा
सातारा : पावसामुळे सातारा शहरातील मंगळवार पेठ, चिपळूनकर कॉलनी, धस कॉलनी आणि समर्थ मंदिर परिसरातील तारळेकर ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह बंद झाला असून, दुर्गंधीचा येथील नागरिकांना त्रास करावा लागत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व ओढ्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गुरूवार परजावरील रस्ता पुन्हा खड्ड्यात
सातारा : पाऊस सुरू झाल्यापासून साताऱ्यातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील गुरुवार परज परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून खड्ड्यांची व्याप्ती वाढतच चालली आहे. हे खड्डे चुकवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, पालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
महाबळेश्वरचा पारा १४ अंशांवर
महाबळेश्वर : सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा हळूहळू खालावू लागला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २४.४ तर किमान तापमान २१.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यात थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. थंडीमुळे उबदार कपडे व छत्र्यांनादेखील मागणी वाढली आहे.
व्हॉल्व्हला गळती; पाण्याचा अपव्यय
सातारा : शहरातील बुधवार नाका चौकातील पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. याविषयी नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही पालिकेकडून ही गळती काढली जात नाही. या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेने या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीची मागणी
सातारा : सातारा - कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील वाहतूक सध्या धोकादायक ठरू लागली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून घाटात दरड कोसळण्याच्या व रस्ता खचण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या घाटातील संरक्षक कठड्यांचीदेखील पडझड झाली असून, काही ठिकाणी संरक्षक कठडे केवळ नावालाच उरले आहेत. बांधकाम विभागाने कठड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.